शिवसेना उबाठाचे आंदोलन तात्पुरते स्थगित
तहसीलदार यांनी मध्यस्थी करीत काढला सुवर्णमध्य
आजरा (हसन तकीलदार) : आजरा- बुरुडे रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि याकडे बांधकाम विभागाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष त्याचप्रमाणे यामुळे होणारे अपघात या सर्व कारणामुळे शिवसेनेने आक्रमक रूप धारण करीत कंपनी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवसेना उबाठाने रस्त्यावर वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करीत जाग आणण्यासाठी आंदोलनाचे निवेदन दिले होते. यासाठी तहसीलदार समीर माने यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात कंपनी ठेकेदार, बांधकाम विभागाचे अधिकारी, शिवसैनिक आणि बुरुडे व इतर रहिवासी यांची तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली. या बैठकीत तहसीलदार समीर माने यांनी सुवर्णमध्य काढीत महत्वाची भूमिका बजावली. अखेर आठ दिवसात खड्डे मुजवण्याचे आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका संघटक संजय येसादे आणि तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी आक्रमक भूमिका घेत संतप्त सवाल करून अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. माणसे मेल्यावर तुम्हाला जाग येणार का? एकमेकाकडे बोट दाखवून आमची आणि तालुकावासियांची दिशाभूल करू नका. आमच्या सहनशिलतेचा अंत बघू नका, वेळप्रसंगी आम्ही अधिकाऱ्यांना कोंडून घालण्यास मागे पुढे होणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने तहसीलदार यांनी मध्यस्थी करीत आय सी कंपनीचे पर्यवेक्षक धनंजय गवळी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी सुर्वे यांनी आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. जर आठ दिवसात खड्डे भरले नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कंपनी आपल्याला या रस्त्याचा ठेका दिलेला नाही असे म्हणते तर बांधकाम विभागाचे अधिकारी ठेका दिला आहे असे म्हणतात. एकमेकाकडे बोटे दाखवण्याचा प्रकार थांबला पाहिजे. कामात समन्वयाची आवश्यकता आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरीष्ठाशी संपर्क साधून योग्य मार्ग काढणे आवश्यक होते असेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बुरुडे सरपंच वैषाली गुरव, उपसरपंच सुनील बागवे, हत्तीवडे उपसरपंच प्रमिला पाटील, मेंढोली सरपंच विलास जोशीलकर, हरिश्चंद्र व्हराकटे, ओंकार माद्याळकर, सूर्यकांत कांबळे, महेश पाटील, गीता देसाई, सुयश पाटील, दिनेश कांबळे, कारखाना संचालक हरिभाऊ कांबळे, सुनील डोंगरे उपस्थित होते.