भाजप अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी वेधले पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यातील परिणामकारक महापूर नियंत्रणासाठी शासनाच्या सर्व मंत्रालय विभागांच्या समन्वयाने सर्वसमावेशक कायमस्वरूपी "आदर्श मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP) राबवावी अशी मागणी भाजप अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात वारंवार येणारा महापूर आणि प्रत्येक वर्षी पुरबाधितांचे पुनर्वसन, वित्त व जिवितहानी, त्यांचे पंचनामे, नुकसान भरपाई यामुळे प्रशासनावर आणि राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येतो.
वारंवार पूर का येतो याचा अभ्यास करण्यासाठी ताबडतोब तज्ञांचा नवा आयोग गठीत करावा. राज्यातील सर्व नाल्यांची आणि नद्यांची जलसंपदा विभागाकडून पूररेषा निश्चित करावी.नद्या नाल्यांतील वाळू आणि गाळ उपसण्याचे त्यांची खोली वाढवण्याचे अस्तीत्वातील पुला़ंची महत्तम पुर रेषेनुसार उंची वाढवण्यासाठी निश्चित धोरण ठरवणे आवश्यक आहे. पूररेषेत बांधकामे होऊ नयेत याची दंडात्मक तरतुद आणि झालेली बांधकामे नियमित न करता ती पाडून टाकणे. तसेच नद्यांवर हमरस्त्यांचे पूल बांधताना दोन्ही बाजूला भराव टाकून नद्यांचा प्रवाह न अडवता मोकळ्या आरसीसी काॅलमवरील बांधकामे या बाबींचा सर्वंकष विचार होऊन गठीत केलेल्या पुरनियंत्रण आयोगाचा अहवाल राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या पटलावर ठेवून कायमस्वरूपी महापूर नियंत्रणासाठी विधिमंडळात सर्व समावेशक अशी शासनाचे गृह, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, ग्रामीण व नागरी विकास, जलशक्ती व पाटबंधारे. विभागांचे समन्वय साधणारी STANDARD OPERATING PROCEDURE ( SOP) अंमलात आणावी अशी मागणी श्री. सावंत यांनी या पत्रातून केली आहे.