ठाकरे शिवसेनेच्या वतीने पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पाटबंधारे विभाग दक्षिणचे कोल्हापूर येथील कार्यालय गडहिंग्लज येथे स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, स्मिता माने यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पाटबंधारे विभागाच्या सोयीसाठी कोल्हापूर दक्षिण व उत्तर असे दोन विभाग करण्यात आले आहेत. दक्षिण विभागात गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व कागल अशा पाच तालुक्यांसाठी गडहिंग्लज हे केंद्रस्थानी असून दक्षिण विभागाचे कार्यालय सर्वांच्या सोयीसाठी गडहिंग्लज येथे असणे आवश्यक आहे. सध्या प्रशासनाने दोन्ही कार्यालये कोल्हापूर जिल्हा मुख्यालयातच ठेवली आहेत. ही व्यवस्था अधिकाऱ्यांसाठी सोयीची असली तरी शेतकऱ्यांसाठी अत्यंत गैरसोयीची, खर्चाची आणि वेळकाढूपणाची आहे.
चंदगड, भुदरगड अशा १०० किमी अंतरावरील शेतकऱ्याला या कार्यालयातील कामासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे. त्यामुळे एक दिवस खर्ची पडतो. प्रवास खर्चाचा भुर्दंड पडतो. एका भेटीत काम होईलच याची खात्री नसते, सतत हेलपाटे मारावे लागतात. या विभागात तातडीने काही मदतीची आवश्यकता असली तर कोल्हापूर येथून अधिकांऱ्यांना तातडीने येणे अशक्य आहे. कोल्हापूर दक्षिण विभागात चित्री, चिकोत्रा, आंबेओहोळ, सर्फनाला, घटप्रभा, जांबरे, जंगमहट्टी व पाटगाव असे मध्यम प्रकल्प आणि पंचवीस लघू प्रकल्प आहेत. येथे कार्यकारी अभियंता यांना कोल्हापूरहून यावे लागते. हेच कार्यालय गडहिंग्लज येथे झाल्यास शेतकऱ्यांसाठी सोयीचे होणार असून सर्वांचीच गैरसोय टाळता येणार आहे. गडहिंग्लज हे शहर पाचही तालुक्यांना मध्यवर्ती आणि सर्व सोयी असणारे ठिकाण आहे. असे असताना दक्षिण विभागाचे कार्यालय कोल्हापूर येथे ठेवण्यात प्रशासनाचा कोणता हेतू आहे हे समजत नाही. केवळ प्रशासनाच्या सोयीसाठी कोल्हापूरला कार्यालय ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे दक्षिण विभागाचे कार्यालय तातडीने गडहिंग्लजला स्थलांतरीत करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, सुरेश चौगुले, वाहतूक सेना अध्यक्ष हर्षल पाटील, कामगार सेना अध्यक्ष राजू सांगावकर, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, भुदरगड तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, कृष्णा डाकरे, राधानगरी तालुका प्रमुख उत्तम पाटील, बाळासाहेब पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, प्रसाद पिलारे, राजकिरण सावडकर, अविनाश परीट, मारुती पुरीबुवा, बचाराम गुरव, विक्रम मुतकेकर, सागर भावके, विक्रम पाटील यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.


