ठाकरे शिवसेनेची टोलनाक्यावर धडक ; टोलबाबत घेतली माहिती
आजरावासियांना विश्वासात घेऊन, चर्चा करूनच टोल सुरु करा : उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील
आजरा (प्रतिनिधी): संकेश्वर -बांदा महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावर टोल वसुलीचे काम सुरु होण्याचे संकेत दिसत आहेत. टोलनाका टोलसाठी सज्ज झाला आहे. या टोल विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी हुंकार भरला होता परंतु पावसाळा, गणपती आणि त्यानंतर आचारसंहिता यामुळे टोलचे आंदोलन थांबले आणि विरोध काहीअंशी कमकुवत झाला. परंतु काल टोल सुरु होणार असे समजताच शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टोलनाक्यावर धडकले. परंतु टोल सुरु झाले नसल्याने परत फिरले.
महामार्गाचे निकष पूर्ण न करताही सरकार आजरेवासियावर टोलची टांगती तलवार ठेवली आहे. वेळोवेळी आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढुन टोलच्या भुताला रोखण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु आता टोलनाक्याचे काम पूर्ण झाले असून टोल वसुली करत आहेत असे समजताच उबाठा चे शिवसैनिक टोल नाक्यावर जाऊन धडकले.
यावेळी उप जिल्हा प्रमुख संभाजी पाटील म्हणाले, आजरा तालुक्याच्या जनतेची फसवणूक करून जर टोल सुरु करीत असतील तर शिवसैनिक हे कधीही चालू देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि टोल सुरु करावा.
आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, आजरा तालुका वासियावर टोल बसू नये म्हणून गेली दोन वर्षे लढा सुरु आहे. जर टोल सुरु केला तर शिवसैनिक प्रसंगी गुन्हे अंगावर घेऊन टोल उखडून टाकतील असा इशारा त्यांनी दिला.
शिवसैनिक टोलनाक्यावर धडकल्याचे समजताच स. पो.नि.नागेश यमगर आपल्या फौज फाट्यासह पोहचले परंतु शिवसैनिकांनी टोल सुरु झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आलो आहोत असे स्पष्ट केल्यानंतर पोलीस माघार फिरले. यावेळी शिवसैनिकांनी टोलला पूर्णपणे विरोध केला.
यावेळी गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीपराव माने, हरिश्चंद्र व्हराकटे, ओमकार माद्याळकर, बिलाल लतीफ, समीर चांद, सुरेश औरगोळे, महादेव गुरव, रवींद्र सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.




