Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कामाचा दर्जा व गुणवत्तेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख विकास प्रकल्प माहिती आढावा बैठक 





कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात विविध विकासकामे सुरू आहेत. ही प्रमुख विकास कामे करत असताना त्या कामांमध्ये दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करुन त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सोयी -सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले.

           



जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्प माहिती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आ. राजेश पाटील, बाबासाहेब आसुर्लेकर उपस्थित होते .

          



ते पुढे म्हणाले, विविध विकास कामांसाठी अनुभवी कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात यावा. तकलादु कामे नको. किल्ले पन्हाळ्याची डागडुजी व सुशोभीकरण करत असताना तेथील स्थानिकांना विश्वासात घ्या तसेच हे काम अल्प कालावधीत पूर्ण करा जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटन वाढेल. मात्र हे करत असताना त्या कामाची गुणवत्ताही अबाधित ठेवण्यात यावी, अशी सूचना करुन आवश्यक त्या कामासाठी शासनाकडून तात्काळ निधी देण्यात येईल त्याचबरोबर संबंधित केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा करु असे सांगितले.

     



जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तीस विभागांना जागा देण्यात आली आहे. किल्ले पन्हाळा येथे डागडुजी व सुशोभीकरणाबाबत तेथील लोक सकारात्मक असल्याचे सांगून येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंक्शन सेंटरचे भूमिपूजन करण्यात येईल. तसेच सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांसाठी शासनाकडून सुमारे 70 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.




कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कोल्हापूर शहर मनपाच्या नवीन इमारत उभारणीसाठी शेंडा पार्क येथे दोन एकर जागा मिळावी, अशी मागणी करत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असल्याचे सांगितले तर राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगला असल्याचे सांगत, जिल्हा परिषदेच्या सुमारे 1958 शाळांचा 'समृद्ध शाळा' या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पुढील पाच वर्षाचा नियोजन व कालबद्ध कार्यक्रम जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले. 



यावेळी महालक्ष्मी/ अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा, किल्ले पन्हाळा डागडुजी व सुशोभीकरण, क्रिकेट स्टेडियम, इंटरनॅशनल कन्व्हेंक्शन सेंटर, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, आयटी हब, शेंडा पार्क येथील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसेच कोल्हापूर - रत्नागिरी NH-166 आदी बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.



या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यावेळी मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.