संपूर्ण गावाची तहान भागविणाऱ्या या विहिरीची व्यक्त केली कृतज्ञता
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील सार्वजनिक गावठाण (गोठण)विहिरीचे पूजन करून ग्रामस्थांनी जागतिक जलदिन साजरा केला. दरवर्षी ग्रामस्थांमार्फत जलदिनी या विहिरीचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येते.
श्री कल्लेश्वर दूध संस्थेचे चेअरमन रमेश यामी यांच्या हस्ते विहिरीचे पूजन करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन चौगुले, शिवानंद यशागोळ, जमीर हवालदार, रामा चौगुले, बाळासाहेब कांबळे, गजानन देसाई, विनायक तोडकर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक व महादेव भकरी यांनी या कार्यक्रमाचे केले होते.
भडगाव गावालगत ही सार्वजनिक गोठण विहीर आहे. १९५१ साली जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून ९,९९८ रुपये खर्च करून ही विहीर बांधण्यात आली आहे. गेली कित्येक वर्ष भडगावकरांचे तहान भागवण्याचे काम ही विहीर अविरतपणे करत आहे. गेल्या नऊ वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक व महादेव भकरी यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ दरवर्षी २२ मार्च जागतिक जलदिनानिमित्त या सार्वजनिक विहिरीचे पूजन करतात. या पार्श्वभूमीवर आज देखील या सार्वजनिक विहिरीचे पूजन ग्रामस्थांनी केले.