अर्थसंकल्पातून मंजुरी ; भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
आमदार शिवाजीराव पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडत गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील प्रलंबित रस्ते व पुलांच्या प्रश्नांवर घडवली चर्चा
मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांचा प्रश्न उपस्थित केला. लक्षवेधी सूचना मांडून या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, जरळी व आजरा तालुक्यातील हारूर, गजरगाव या पुलांच्या कामांना अर्थसंकल्पातून मंजुरी आहे. या पुलांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच कामांना प्रारंभ होणार आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील-दुंडगे, माणगाव, हेरे, कानडी - इमान सावर्डे , चंदगड, हल्लारवाडी, भंडूरा, गडहिंग्लज तालुक्यातील-निलजी, जरळी. आजरा तालुक्यातील-सरोळी- ऐनापुर, हरूर-गजरगाव तसेच नेसरी-डोणेवाडी यांना जोडणारा पूल ५० वर्षांपासून प्रलंबित आहे तो होणे आवश्यक आहे. वरील या सर्व पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.
चंदगड तालुक्यातील पारगडकडे जाणार रस्ता करणे गरजेचे आहे. हा रस्ता पुढे सिंधुदुर्ग मार्गे गोवा राज्याकडे जात असल्याने यावरुन वाहतूक मोठ्याप्रमाणत असते. हा रस्ता झाल्याने तेथील नागरिकांना दळणवळण करणे शक्य होईल तसेच गडाकडे जाण्यासाठीही वाहतूक सुरळीत होईल. १) चंदगड - तिलारी- मापसा अंतर- ८४ की.मी. आहे २) चंदगड- झांबरे- मापसा- ६० की.मी. आहे. ३) शिनोळी - तुडिये - कोलिक - कणकुंबी - मापसा - ७० कि.मी. आहे, ४) शिनोळी - बेळगाव - पणजी - १०९ कि.मी. आहे.
चंदगड तालुक्यात १६ धनगरवाडे असून त्या धनगरवाड्यांना जोडणारे रस्ते नाहीत ते करणे गरजेचे आहे. पक्के रस्ते नसल्याने आजही या धनगरवाड्यातील नागरिकांना रुग्णांना घेऊन ५ ते ७ किलोमीटर पायपीट करावी लागते अशा परिस्थितीत तो रुग्ण जगेल याची शाश्वती नसते एवढी बिकट अवस्था या भागात आहे, याबाबीकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. येथे पक्के रस्ते केले पाहिजेत जेणेकरून हे लोकही मुख्य प्रवाहात येतील, रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहचवू शकतील, इतर भागात दळणवळण करू शकतील, स्वतःचा विकास करण्याची शक्य होईल.
चंदगड तालुक्यातील कोलिक हे गाव कर्नाटक सीमेलगत आहे. कोलिक या गावापासून चंदगड शहराचे अंतर ६० किलोमीटर आहे, या गावाला जोडणारा रस्ता ७० वर्षांपासून झालेला नसणे, आशा अवस्थेत येथून रुग्णांना वेळेवर उपचारासाठी दाखल करता येत नाही ही गंभीर बाब आहे,हा रस्ता होणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये या गावाचा संपर्क तुटतो वाहतूक करणे शक्य होत नाही येथील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. तसेच गडहिंग्लज तालुक्यातील निलजी ते सीमावर्ती भागापर्यंत रस्ता होणे आवश्यक आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्ते -
वेंगुर्ला - आंबेवाडी - नागणवाडी बेळगाव रस्ता हा रस्ता राज्य मार्ग क्रमांक १८० चा असून चंदगड तालुक्यातील लांबी हि ४३.२० कि.मी.आहे. सदर रस्त्यावर वाहतूक वाढली असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असणे. तसेच, रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असणे. सदर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरण झाल्यास तालुक्यातील पर्यटन, धार्मिक व व्यवसायिक वाढ होईल. राज्य मार्ग १८९ ते घोडगेवाडी - मिरवेल - पारगड - नामखोल - तेरवण - वाघोत्रे ते राज्य मार्ग ला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक १८७ -सदर रस्त्याची एकूण लांबी ही ३८/४०० कि.मी. इतकी आहे. सध्या गोवा - कोकण ला जोडणारे आंबोली घाट व तिलारी घाट नादुरुस्त असल्याने अवघड वाहतुकीस प्रतिबाधित आहे. सदर रस्ता रुंदीकरण झाल्यास पर्यटन व व्यावसायिक वृद्धी होईल. राज्य मार्ग क्रमांक १८७ ते रामघाट इसापूर ते कोल्हापूर जिल्हा हद्द रस्ता प्रमुखजिल्हा मार्ग क्रमांक - ७५.
सदर रस्त्याची लांबी ही ५.०० कि.मी.इतकी आहे. सदर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरण झाल्यास पर्यटन वाढीस मदत होईल. तसेच, नागरिकांचे दळणवळण करणे, इतर वाहतूक करणे व व्यापार वाढ होण्यास मदत होईल. प्रमुख जिल्हा मार्ग ६५ ते नागरदळे - करेकुंडी - सुंडी - महिपाळगड - शिनोळी - तुडये रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ६८ - सदर रस्त्याची लांबी ही २९/१०० कि.मी. सदर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरण झाल्यास पर्यटन वाढीस मदत होईल. कोल्हापूर - गारगोटी - गडहिंग्लज - चंदगड - मोटणवाडी - भेडशी रस्ता राज्य मार्ग १८९ कि.मी.१३५/२४० - कि.मी.१३५/२४० वर सध्या सबमर्सिबल पूल आहे. सदर पूल पावसामध्ये १ महिने पाण्याखाली असतो. सदर पूल उडाणपूल प्रकारचा झाल्यास आरोग्य, शेती, पर्यटन, आर्थिक व व्यावसायिक वाढ होईल. कोल्हापूर गारगोटी - गडहिंग्लज - चंदगड - मोटणवाडी - भेडशी रस्ता राज्य मार्ग १८९ कि.मी.९०/४८० मध्ये पूल बांधणे - कि.मी.९०/४८० वर अस्तित्वातील पूल हे सबमर्सिबल आहे. सदर पूल पावसात वारंवार वाहतुकीस बंद असते. सदर पूल उंच झाल्यास आरोग्य, शेती, पर्यटन, आर्थिक व व्यवसायिक वाढ होईल.
चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांचा भाग हा डोंगराळ असून यातील काही भागात पावसाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे येथील गावांचा संपर्क तुटतो यास्तव येथील पुलांची उंची वाढवणे गरजेचे असून या ठिकाणी पक्के रस्ते, पूल असणे गरजेचे आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघ डोंगराळ भाग असल्याने येथे वाड्या वस्त्या मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या आहेत, येथे वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून काही रस्ते त्यांच्या जागेतून जात आहेत अशावेळी येथे रस्ते बनविताना वनविभागाकडून अडचणी येत असतात यास्तव रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे बारगळली जातात यावरही शासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक गडकिल्ले पर्यटकांना आकर्षित करतील परंतु यांना जोडणारे पक्के रस्ते नाहीत ते झाल्यास पर्यटन वाढदेखील होईल स्थानिकांना रोजगार देखील भेटेल त्यामुळे यांना जोडणारे पक्के रस्ते होणे गरजेचे आहे. याकडे आमदार शिवाजीराव पाटील यांनी लक्ष वेधले. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले जातील असे आश्वासन दिले.
व्हिडिओ येथे पहा 👇👇