आजऱ्यात शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीचा वन विभागाला '३० मार्चपर्यंत अल्टिमेटम'
आजरा (हसन तकीलदार): वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीपर्यंत झालेला वावर, पिकांचे होणारे नुकसान, तूटपुंजी मिळणारी नुकसान भरपाई, सौर कुंपणासाठी १०० टक्के अनुदान, पोस्त, वनदेव क्षेत्र यात्रा यासारखे धार्मिक कार्य करण्याची परवानगी मिळावी आदी मागण्यांचे निवेदन वनअधिकारी सुरेंद्रकुमार कोळी यांना शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीतर्फे देण्यात आले. ३० मार्च पर्यंत मुख्य वनसंरक्षकांसोबत आजरा येथे बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा ३१ मार्चला वनविभागाच्या कार्यालयाला मोर्चाने येऊन टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हत्ती, गवे, रान डुक्करे, माकडे, ससे यासह इतर वन्यप्राणी शेतकऱ्याच्या शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यांच्यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना आखाव्यात व त्याचपद्धतीने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, शिमगा सणाच्या कालावधीत पोस्तसारख्या धार्मिक परंपरेवर एक प्रकारची जी बंदी घातली आहे ती शिमगा सणाच्या कालावधीत शिथिल करावी, चाळोबा, मसोबा, खेतोबा देवतांच्या वार्षिक यात्रा, उत्सव साजरा करण्याची परवानगी मिळावी, प्राण्यांपासून शेती पिकांचे नुकसान तर होतेच परंतु रात्रीच्या वेळी पिकांच्या राखणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिविताला धोका असतो. शेती आणि आत्मसंरक्षणासाठी तातडीने बंदूक परवाने मिळाले पाहिजे आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत.
यावेळी बोलताना राजू होलम म्हणाले, जंगल भागात झाडे लावण्याची मोहीम सुरु करा. अकेशिया, निलगिरी यासारख्या झाडांची मोठ्या प्रमाणात जंगलात लागवड केल्याने जंगलाची जैवविविधता नष्ट होत आहे. या ऐवजी वड, पिंपळ, हाळू, ऐन, किंजळ, चिंच, धामण, आंबा, फणस यासारखी फळे देणाऱ्या व जैवविविधता जपणाऱ्या झाडांची लागवड करा. अकेशिया आणि निलगिरी सारखी झाडें लावल्याने जमिनीवर त्यांचा पाला पडून जमीन नापिक होत आहे. परिणामी जंगलात चारा उगणे बंद झाले आहे. त्यामुळे ही वन्य प्राणी शेती पिकाकडे वळत आहेत. कागद कारखाने जगवण्यासाठी अकेशिया, निलगिरी सारखी झाडे लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
स्थानिक प्रजातींची लागवड करण्याची मोहीम हाती घेण्याबाबत कॉ. संपत देसाई यांनी सांगितले. प्रकाश मोरूस्कर यांनीही यावेळी लक्षवेधी सूचना मांडत ५० हजाराच्या आतील नुकसान भरपाई देण्याचा अधिकार परीक्षेत्र वन अधिकारी यांना द्यावा जेणेकरून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यास उपयोगी ठरेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संजयभाऊ सावंत, कॉ. शांताराम पाटील, दशरथ घुरे, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, बयाजी येडगे, रवी जाधव आदिसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.