वनाधिकारी सौ. रुपाली पाटील यांचे मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी ) : येथील साधना प्रशालेत 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गडहिंग्लज वन खात्यातील वनाधिकारी सौ. रुपाली पाटील व श्री. कुरबेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वागत व प्रास्ताविक शितल हरळीकर यांनी केले. वनांचे महत्त्व व त्यांचे संरक्षण, जनजागृती, वनसंवर्धनासाठी उपाययोजना यावर वनाधिकारी सौ. रूपाली पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वन खात्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध नोकरीच्या संधी याबद्दल माहिती दिली. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन केले पाहिजे असे मत प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी व्यक्त करून जागतिक वन दिनाचा इतिहास सांगितला.
प्रशालेच्या हरित सेना प्रमुख अफसाना यळकुद्रे यांनी इको क्लबची माहिती सांगून आभार मानले. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत अनुक्रमे तनिष्का शिवणे, आदर्शिनी लोहार व अनन्या शिंदे या विद्यार्थिनींनी यश मिळवले. त्याचबरोबर या उपक्रमांतर्गत इयत्ता नववी मधील सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका शितल भवारी यांनी केले.