संत गजानन पॉलिटेक्निकमध्ये उद्योजकतेवर व्याख्यान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कॉलेजचे शिक्षण घेताना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी भविष्यात एखाद्या उद्योजकाकडे नोकरीसाठी हात पसरण्यापेक्षा स्वतःचा उद्योग निर्माण करून नोकऱ्या देणारे बना. मात्र उद्योग, व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रचंड आव्हाने आहेत. योग्य कौशल्य वापरून,नियोजन करून, ग्राहकांच्या गरजा, आवड, मागणी याचा विचार करून उद्योग किंवा व्यवसाय केल्यास आपण या स्पर्धेत यशस्वी उद्योजक बनू शकता. असा सल्ला महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्रकाश चौगुले यांनी दिला.
महागाव येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक कॉलेजमधील इलेक्ट्रिकल विभागामार्फत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित 'उद्योजकता' या विषयावर व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य विक्रम मोहिते होते.
प्रास्ताविक प्रा. देवेश कर्ण यांनी केले. श्री.चौगुले पुढे म्हणाले, आपण निवडलेला व्यवसाय इतरापेक्षा वेगळा असला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, योग्य निर्णय, व्यवस्थापन, कार्यक्षम विपणन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. शासनाच्या रोजगार निर्मितीसाठी असलेल्या योजनांचा अभ्यास करा असे सांगत यशस्वी उद्योजकांची उदाहरणे दिली.
यावेळी आयआयसीचे अध्यक्ष प्रा.एस.ए. हवळे, प्रा.श्रीनाथ रावण, प्रा. अश्विनी पाटील, प्रा. स्नेहल पाटील, प्रा. सुजाता चौगुले, सुनिल पोवार, सुहास कुंभार, उपस्थिती होती. सूत्रसंचालन स्नेहल मोरे हिने तर सिद्धार्थ बंदी आभार मानले. प्राचार्या रोहिणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयसीचे उपाध्यक्ष एस व्ही चौगुले, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रदीप लोंढे यांच्या सहकार्याने सदर व्याख्यान पार पडले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



