गडहिंग्लज तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांची पत्राद्वारे सूचना
शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधताच तातडीने कार्यवाही
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शाळेच्या वेळेत शिक्षकांनी मोबाईलचा वापर करू नये. यामध्ये निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी गडहिंग्लज तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना पत्राद्वारे दिल्या आहेत. यापूर्वी या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देत याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर हे आदेश काढून पुन्हा एकदा शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी सुद्धा सर्व मुख्याध्यापक व अध्यापक यांना शालेय वेळेत मोबाईल न वापरण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या असूनही अशा प्रकारच्या तक्रारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. यावरून कामकाजामध्ये निष्काजीपणा, दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. असे या पत्रात म्हटले आहे. शासकीय नियमानुसार शाळेच्या वेळेत अध्यापन करत असताना मोबाईल बंद ठेवण्याबाबत दक्ष राहावे. यामध्ये निष्काळजीपणा निदर्शनास आल्यास व पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना या या पत्राद्वारे दिल्या आहेत. शिक्षकांनी अध्यापनासाठी वर्गात जाताना मुख्याध्यापक यांच्याकडे आपले मोबाईल जमा करावेत अशा सूचना देखील या पत्रातून निर्गमित केल्या आहेत.

