Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आंबेओहोळ प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशी नदीत सोडा!

गडहिंग्लज विभाग शेतकरी सर्व मोटर पंपधारक अन्याय निवारण समितीची मागणी 


गडहिंग्लज उपविभागीय पाटबंधारे कार्यालयाला दिले निवेदन





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आंबेओहोळ प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशी नदीत सोडण्यात यावे अशी मागणी गडहिंग्लज विभाग शेतकरी सर्व मोटर पंपधारक अन्याय निवारण समितीच्या वतीने पाटबंधारेच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.



या निवेदनात म्हटले आहे की, आंबेओहोळ प्रकल्पात सध्या ७५ ते ८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या हिरण्यकेशी नदीतील पाणी कमी पडत आहे. त्यामुळेया प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशीत सोडून पिण्यासाठी  व शेतीसाठी या पाण्याचा वापर करण्यात यावा. आंबेओहोळ प्रकल्पामध्ये साठवण्यात आलेल्या पाण्यापैकी केवळ २५ टक्के पाण्याचा वापर करण्यात आला आहे. उर्वरित पाण्याचा साठा तसाच शिल्लक आहे. आता पावसाळ्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी राहिला आहे. सध्या हिरण्यकेशी नदीपात्रामध्ये अत्यल्प पाणीसाठा असून शेतकऱ्यांना शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. सध्या अति तीव्र उन्हामुळे पिकांसह जनावरांना देखील पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने नदीपात्र ठिकठिकाणी कोरडे पडले आहे.  आंबेओहोळ धरणामध्ये ८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ४५० दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्रामध्ये सोडून देखील ४० टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला होता. सदर पाणीसाठा पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीपात्रामध्ये सोडण्यात आला होता.



चित्री लाभ क्षेत्रातील पाणी हे निलजी बंधाऱ्यापर्यंतच कार्यक्षेत्र आहे. तरीसुद्धा गेल्या वीस वर्षाच्या म्हणजेच २००३ ते २०२४ अखेरचा बंधारा म्हणून ज्या बंधाऱ्याकडे पाहिले जाते असे कडलगे येथील खोत बंधाऱ्यापर्यंत चित्री लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने त्याही शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम केले आहे. अशीच मदत जर आंबेओहोळ मधील असणाऱ्या पाण्याचा वापर झाल्यास या भागातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होणार नाही.  आंबेओहोळ प्रकल्पातील शिल्लक पाणी साठ्यातून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. या मागणीचा विचार करून येत्या पाच-सहा दिवसात आंबेओहोळ प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशी नदीपत्रात न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे.


निवेदनावर अमर चव्हाण, अमृत शिंत्रे, गुरुराज हत्ती, बाळगोंडा पाटील, के डी पाटील, वसंत नाईक, सत्यजित मोळदी, बाळासाहेब कोरी, शंकर चोथे आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.