Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मेडिकल स्टोअर्सवाल्यांनो सावधान.. असा कॉल तुम्हालाही येऊ शकतो!

तेरणीतील मेडिकल स्टोअर्स मालकाला ऑनलाईन फसवण्याचा प्रयत्न फसला



गडहिंग्लज (संतोष नाईक) :
सध्या ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सायबर क्राईम ही डोकेदुखी ठरत आहे. यापासून सतर्क राहण्यासाठी नागरिकांना वारंवार सावधानतेचा इशारा यावर नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाकडून दिला जातो. मात्र भूलथापा मारत विश्वास संपादन करून फसविण्याचा प्रयत्न हे 'ऑनलाईन ठग' करताना दिसत आहेत. असाच प्रकार गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथे मंगळवारी सायंकाळी घडला. येथील जय मल्हार मेडिकल स्टोअर्सचे मालक विनोद आगसगी यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संभाषण साधत ठगविण्याचा प्रयत्न केला. मात्र विनोद यांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने हा त्याचा प्रयत्न फसला.



याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी तेरणीतील जय मल्हार मेडिकल स्टोअर्सचे मालक विनोद आगसगी यांना एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईलवर कॉल आला. "हॅलो सरजी नमशकार...! आपने पहचाना क्या.. जब मै सामने आऊंगा तो आप पहचानोगे...मेरी कुछ दवा की रिक्वायरमेंट थी.. मै तुम्हे व्हाट्सअप करता हु.. उसका बिल बना के मुझे व्हाट्सअप कीजिए. मै ऑनलाईन पेमेंट करता हु...मेरा बंदा दस मिनिट मे आयेगा पॅक करके रकीय.. मै थोडा जल्दी मे हु... असे हिंदीमध्ये त्याने संवाद साधला. औषधांची यादी देखील त्याने विनोद यांना व्हाट्सअप केले. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे विनोद यांनी औषधे काढून पॅक करून ठेवत सदर औषधांच्या बिलाची रक्कम 997 रुपये झाल्याचे त्या व्यक्तीस सांगितले. थोड्यावेळाने पुन्हा त्या व्यक्तीचा कॉल आला. औषधाच्या बिलापेक्षा थोडी जास्त रक्कम मी तुम्हाला सेंड करतो तिथे येणार्‍या व्यक्तीला ते जादाचे पैसे रोख स्वरूपात द्यावेत असे म्हणत "फोन  पे" वरून 6997 रुपये ट्रान्सफर केल्याची स्क्रीन शॉट त्याने विनोद यांना टाकली. या ठगाणे पैसे सेंड केल्याची "फोन पे" ची उभेउभ स्क्रीन शॉट तयार केली होती. ते स्क्रीन शॉट पाहणाऱ्याला जरासुद्धा शंका येत नव्हती. विनोद यांच्या दुकानात गर्दी जास्त असल्याने स्क्रीन शॉट पाहून खरोखरच त्याने पैसे सेंड केले असतील असे वाटले. त्यामुळे त्यांनी होकार दिला.




थोड्यावेळाने पुन्हा त्या व्यक्तीचा कॉल आला. "मै जो बंदा भेजने वाला था वो बंदा थोडा मार्केट के कामसे बहार गया है.. मेरा गुगल पे नही चल रहा है... इसलिये आप छे हजार रुपये ऊस बंदे के नंबर पे ट्रान्सफर कीजिए....!अशी भुलताप त्याने मारली. वारंवार पाच- पाच मिनिटाला त्याचा कॉल येत असल्याने विनोद यांना शंका आली त्यामुळे त्यांनी आपला फोन फ्लाईट मोडवर टाकून सोडला. विनोद वेळीच सतर्क झाल्याने ऑनलाइन फसवणूकीपासून ते बचावले. अन्यथा 6000 रुपयांचा फटका त्यांना सोसावा लागला असता. विनोद यांनी आलेल्या नंबरचे स्टेटस तपासले स्टेटसला सदर ठग्याने सैन्य दलातील पोशाखातील फोटो ठेवल्याचे दिसून आले.



गडहिंग्लज शहरातील काही हॉटेल व्यवसायिकांना अशाच प्रकारे फेक कॉल करून गंडा घालण्याचा प्रयत्न अशा ठग्यांनी वर्षभरापूर्वी केला होता. त्यानंतर आता हे "ऑनलाईन ठगे" मेडिकल वाल्यांना ठगवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. त्यामुळे मेडिकल दुकानदारांनीही अशा फेक कॉल पासून सावध राहण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.