Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

क्रांतिकारक, समाज सुधारक महिलांचा आदर्श घ्या!

सहाय्यक शिक्षिका सौ राजश्री कोले यांचे प्रतिपादन


दुंडगे येथे स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त 'स्त्री शक्तीचा जागर' व्याख्यान





जरळी (वार्ताहर): राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ यांच्यासह विविध महिलांनी मोठ्या धाडसाने क्रांती घडविली. या क्रांतिकारक व समाजसुधारक महिलांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा असे प्रतिपादन भडगाव येथील सहाय्यक शिक्षिका सौ. राजश्री कोले यांनी केले.



दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी परिक्रमामध्ये 'स्त्री शक्तीचा जागर' व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.



सौ. कोले पुढे म्हणाल्या, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ म्हणत होत्या संसार म्हणजे सायकल, पुढील चाक पती, मागील चाक पत्नी असते. संसाराचे ओझे मागील चाकावर असते. स्त्री म्हणजेच घड्याळाच्या मध्यभागातील चाक असते, सर्व काटे त्यावर अवलंबून असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात देशाची प्रगती मोजायची असेल तर इथल्या महिलांची प्रगती मोजा. आयुष्यात आलेल्या कोणत्याही प्रसंगाला महिला मोठ्या धाडसाने सामोरे जातात, त्या परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते. याचे उदाहरण देताना सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन प्रवासावर सौ. कोले यांनी प्रकाशझोत टाकला. परिस्थितीशी दोन हात करत जीवन कसे जगावे हे सिंधुताईंकडून शिकावे. स्वतःला सिद्ध करायचे असेल स्वतः सामर्थ्यवान बनावे. हे करत असताना स्वतःकडेही लक्ष द्यावे. आपली, कुटुंबाची, गावची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यावे.  स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह किरण बेदी, कल्पना चावला, सुधा मूर्ती, विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आदी महिलांनी धाडसी निर्णय घेत क्रांती घडवल्याचे त्यांनी सांगितले. 




प्रारंभी मनीष कोले व राजश्री कोले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली. यावेळी झुणका-भाकरी महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमात देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.