ग्रामीण शाखाप्रमुख, शिवसैनिकांच्या पाठीशी वरिष्ठानी उभे राहावे
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचे आवाहन
पक्ष वाढीसाठी 'गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक': जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे
गडहिंग्लज येथे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन
![]() |
गडहिंग्लज : येथील कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर. शेजारी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह इतर पदाधिकारी. (छायाचित्र : अशपाक किल्लेदार ) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील शाखाप्रमुख, शिवसैनिकांच्या कार्यक्रमांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. यामुळे पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळू शकेल. शाखाप्रमुख व शिवसैनिकांची ताकद वाढविल्यास सर्वांच्या एकीची वज्रमूठ होऊन पक्ष संघटना मजबूत होईल. त्यामुळे प्रत्येक गावागावात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी गडहिंग्लज येथे केले.
गडहिंग्लज येथे शिवसेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उपनेते श्री. दुधवडकर पुढे म्हणाले, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी आजपर्यंत शिवसेनेचा वसा जपत आले आहेत. गडहिंग्लज येथे जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालय सुरू करून त्यांनी छोटेसे सेना भवनच कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. शिवसैनिकांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा. जिल्हासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील गावागावातील शाखाप्रमुख, शिवसैनिक यांना बळ द्यावे. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे. यामुळे त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळू शकेल व पक्ष संघटना मजबूत होण्यास मदत होईल. गाव तेथे शाखा झाल्या पाहिजेत. शिवसेनेत मतभेद, मनभेद चालत नाहीत. मातोश्री वरून आलेला आदेश हा सर्वांसाठी एक सारखाच असतो. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन एकजुटीने काम करावे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ' शिवसैनिक' हीच शिदोरी निर्माण केली आहे. बाळासाहेबांचे विचार मानणारे गावागावात निष्ठावंत शिवसैनिक आहे आहेत. त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. नात्यागोत्यातून, जिव्हाळ्यातून बाळासाहेबांनी वाढलेली ही शिवसेना आहे. प्रत्येक शिवसैनिकाला जपण्याचे काम त्यांनी केले आहे. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हा वारसा अखंडितपणे चालू ठेवला आहे. प्रत्येक गावागावात जाऊन हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसैनिकांनी मांडावेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पक्षासाठी झटावे असे आवाहन त्यांनी केले.
![]() |
गडहिंग्लज : संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांना श्री महालक्ष्मीची प्रतिमा देऊन सत्कार करताना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे. यावेळी उपस्थित इतर पदाधिकारी. |
'गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक' धोरण हाती : जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे
![]() |
गडहिंग्लज : येथे बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे. यावेळी उपस्थित संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सह संपर्क प्रमुख विजय देवणे व इतर पदाधिकारी. |
कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा झाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे 'गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक' हे धोरण ठेवले आहे. आम्ही सर्वजण मातोश्रीचे पाईक आहोत. पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करावयाचा आहे. कुणी आपला चिन्ह पळवला म्हणून आपला पक्ष संपलेला नाही. आपली शिवसेना ही बळकट आहे. शिवसेनेला बळकटी देण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने काम करावे. तळागाळातील शिवसैनिकांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करूया असे आवाहन त्यांनी केले. पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊ त्यांचा मान सन्मान करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
गावागावातील बूथ मजबूत करा : सहसंपर्कप्रमुख विजय देवणे
![]() |
गडहिंग्लज : येथे बोलताना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे. शेजारी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे व इतर पदाधिकारी. |
सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, सेनेचे 40 आमदार गेले तरी सेनेला त्याचा काही परिणाम झालेला नाही. उलट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. येत्या वर्षभरात सहा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शाखाप्रमुख व गटप्रमुखांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. गावागावातील बूथ मजबूत करण्यासाठी मोठ्या जोमाने काम करावे. शिवसेना हा जिव्हाळा व कुटुंब आहे, याची सर्व जबाबदारी प्रत्येक जिल्हाप्रमुखांवर असते. शिवसैनिकांनी आता पाठ टेकायची नाही अहोरात्र झटायचे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करून राज्यात एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी प्रथमेश रेडेकर यांचेही भाषण झाले.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे श्री. दुधवडकर यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमास आजऱ्याचे संभाजी पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख संतोष चिकोडे, युवा सेना प्रमुख अवधूत पाटील, प्रतीक क्षीरसागर, श्रद्धा शिंत्रे यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील शिवसेनेचे व युवा सेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी केले.