प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतले पाण्याचे नमुने
पाहणी अहवालात अधिकाऱ्यांनी केले नमूद
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची दखल घेत केली कार्यवाही
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील खणदाळ ते कडलगे जवळील खोत बंधाऱ्यापर्यंतचे पाणी प्रदूषित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे क्षेत्र अधिकारी ए. आर. पाटील यांनी पाण्याचे नमुने घेतले. येथील पाणी प्रदूषण प्रश्नि गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे निवेदनातून तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी सदर पाण्याचे नमुने घेतले. या पाहणीत पाण्याला दुर्गंधी असल्याचे दिसून आले. पाहणी अहवालात तसे नमूद करण्यात आले आहे.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गेल्या कित्येक वर्षापासून हिरण्यकेशी नदीचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जाते. मात्र खणदाळ बंधारा ते कडलगे जवळील खोत बंधाऱ्यापर्यंतचे नदीचे पाणी दूषित बनले आहे. जनावरांना सुद्धा हे पाणी पिण्यायोग्य नाही. त्याचबरोबर या पाण्याचा शेतीसाठी वापर करत असताना शेतकऱ्यांना त्वचेच्या आजारालाही सामोरे जावे लागत आहे. कर्नाटकातील संकेश्वर शहरातील व हिरण्यकेशी साखर कारखान्याचे सांडपाणी या नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषण होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. कारखान्याला न्यायालयाने दंडही ठोठावला होता. तरी देखील अद्याप सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होत आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून दिला होता.
या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी नांगनूर बंधाऱ्याच्या अगोदर हिरण्यकेशी कारखान्याकडून येणाऱ्या नाल्यातील पाण्याचे नमुने घेतले असता पाण्याला दुर्गंधी असल्याचे जाणवले. तसेच नांगनूर बंधाऱ्यातील पाण्याचा हिरण्यकेशी नदीपात्रातून तसेच शंकरलिंग मठाशेजारून येणाऱ्या संकेश्वर शहरातून वाहणाऱ्या पाण्याचा नमुना घेतला असता येथेही पाण्याला दुर्गंधी असल्याचे दिसून आले. त्यानंतर मठाशेजारी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यातील नदीपत्रातून पाण्याचा नमुना घेण्यात आला. यावेळी अमर चव्हाण, शाहू मोकाशी, अमृतराव शिंत्रे, वसंत नाईक, बाळगोंडा पाटील, संजय मोकाशी, चेतन लोखंडे, अजित मगदूम, रामचंद्र मोकाशी, सोमगोंडा पाटील, रोहन पाटील उपस्थित होते.