गडहिंग्लज (प्रतिनिधी): पार्वती हायस्कूल औरनाळच्या मैदानावर सुरू असलेल्या डॉ. घाळी शालेय लेदरबॉल करंडक क्रिकेट स्पर्धेत परिश्रम विद्यालय दुंडगे संघाने सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या संघाचा तीन धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तर जागृती हायस्कूलच्या संघाने महात्मा फुले हायस्कूल महागाव या संघावर 30 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.
पहिल्या उपांत्य सामन्यात सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. दूंडगेचा सलामीवीर ओमकार नाईकच्या वीस धावा व साईराज देसाईच्या 12 धावांच्या जोरावर आठ षटकात पाच बाद 51 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तर दाखल खेळताना शिंदे हायस्कूलचा अष्टपैलू खेळाडू वैष्णव कुंभारने 24 धावांची एकाकी झुंज दिली. दुंडगेचा संकेत दावणे व शुभम चौगुलेच्या भेदक गोलंदाजीमुळे शिंदे हायस्कूलच्या संघाला आठ षटकात चार बाद 48 धावा करता आल्या. रोमांचकारी सामन्यात परिश्रम विद्यालय दुंडगेने तीन धावांनी विजय मिळविला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात जागृतीचा कर्णधार शुभम साळवेकरने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. सलामीवीर अनुज पाटील बाद झाल्यानंतर शुभम साळवेकर, अर्जुन दळवी व नैतिक तेलवेकरच्या झुंजार खेळीने आठ षटकात चार बाद 71 धावांचे आव्हान दिले. महागावच्या समर्थने दोन षटकात 31 धावा दिल्या तर कुणालने 14 धावात तीन बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना अष्टपैलू समर्थने 17 चेंडूत 25 धावांची खेळी केली. आकाशने नऊ धावा केल्या. जागृतीच्या नैतिक तेलवेकर व प्रीतम दिवटीच्या भेदक गोलंदाजीमुळे महागावने आठ षटकात चार बाद 41 धावापर्यंत मजल मारली. अखेर 30 धावांनी जागृतीने हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
स्पर्धाप्रमुख संपत सावंत, महादेव चिलमी, सागर मेतके, शुभम पेडणेकर, निखिल पाटील, भैय्या हरळीकर, भिमशाप्पा दिवटी यांनी पंच म्हणून काम पाहिले.