आजऱ्यातील 'त्या' टस्कराकडून मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी परिसरात नुकसान
पिकांची, फळझाडांची नासधूस करत असल्याने शेतकरी धास्तावला
हत्तीकडून पाण्याच्या टाक्या, पाईपचीही मोडतोड
हत्तीचे वास्तव्य मासेवाडी जंगल परिसरात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील विविध गावांच्या शेतवडीतून व मानवी वस्तीतून मार्गक्रमण करत गेल्या वर्षी मे महिन्यात चर्चेत आलेला आजरा तालुक्यातील 'त्या' टस्कर हत्तीचे यावर्षी पुन्हा गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीत प्रवेश झाला आहे. या हत्तीने गेल्या तीन चार दिवसात मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे. सध्या या हत्तीचे वास्तव्य मासेवाडी जंगल परिसरात आहे. विविध पिकांची, फळझाडांची व पाण्याच्या टाक्यांची नासधूस हा हत्ती करत असल्याने शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तीच्या हालचालीकडे वन विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
आजरा तालुक्यातील सुळे, लाकूडवाडी या मार्गे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावच्या हद्दीतून या हत्तीने मांगनूर तर्फ सावतवाडी या गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी प्रवेश केला. या ठिकाणी सलग तीन दिवस हत्तीने मुक्काम ठोकला होता. त्यानंतर तो मासेवाडी जंगल परिसरात दाखल झाला आहे. मांगनूर तर्फ सावतवाडी येथील भाऊसो शिंगटे यांच्या ऊस शेतीचे, सूर्यकांत शिवाजी देसाई यांच्या पाण्याच्या टाकीचे व सिमेंटच्या पत्र्याचे, शिवाजी आप्पा सावंत यांच्या फणसाच्या व केळीच्या झाडांचे नुकसान त्याने केले आहे.
मासेवाडी गावातील सुरेंद्र गायकवाड यांच्या ऊस शेतीचे तसेच केळी, पपई व आंब्याच्या झाडांचे नुकसान केले असून त्यांच्या पाण्याच्या पाईपची देखील तोडफोड केली आहे. हनुमंत निंगाप्पा बामणे यांच्या ज्वारी पिकाचेही नुकसान या हत्तीने केले आहे. या हत्तीला हुसकावण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
हत्तीने केलेल्या नुकसानीची माहिती वन विभागाकडून घेतली जात आहे. सध्या या हत्तीचे वास्तव्य मासेवाडी जंगल परिसरात आहे. गेल्या वर्षी दुगुनवाडी परिसरातून लिंगनूर तर्फ नेसरी, मनवाड, हलकर्णी, नौकुड, चिंचेवाडी परिसरातून या हत्तीने मार्गक्रमण केले होते. पुढे तेरणीमार्गे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरून राष्ट्रीय महामार्गावर हा हत्ती गेला होता.
कर्नाटक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तीला पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत हुसकावले होते. गडहिंग्लज वन विभागाच्या टीमने या हत्तीला शांतपणे हाताळत सुखरूपपणे परतवून लावले होते. त्यामुळे गेल्या वर्षी हत्तीचे हे संकट टाळले होते. त्यानंतर आता यावर्षी पुन्हा या हत्तीने गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला आहे. चारा-पाण्यासाठी तो नासधूस व तोडफोड करत असल्याने शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनुष्यहानी होऊ नये म्हणून वनविभागाकडून खबरदारी!
गतवर्षी आजरा तालुक्यातून आलेला टस्कर हत्ती हा पुन्हा गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीत आला आहे. मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी या गावात गेल्या तीन-चार दिवसात शेती पिकाचे नुकसान व साहित्याची तोडफोड त्याने केली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती वन विभागामार्फत घेण्यात येत आहे. या हत्तीमुळे कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी होऊ नये याची खबरदारी वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत. हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. हत्ती बिथरेल असे कोणत्याही प्रकारचे कृत्य लोकांनी करू नये. शेतकऱ्यानी शेताकडे जाताना खबरदारी व सतर्कता बाळगावी असे आवाहन वनपाल पी. जी. वारंग यांनी केले आहे.