मुंबई : राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारातील मागणी असणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देणे, भांडवल उपलब्ध करणे आणि त्या वस्तुंचे ब्रँडिग, मार्केटिंग करणे यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे तात्पुरते स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. राज्यातील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि मॉल्स मध्ये काही स्टॉल तातडीने बचत गटांना कसे उपलब्ध करुन देता येतील, याचे नियोजन करावे. अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिली आहे.
महिला सशक्तीकरण अभियान यांच्याविषयीची आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
दीर्घकालीन उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बचत गट मॉल ही संकल्पना सुद्धा इतर जिल्ह्यात राबवावी. या अभियानातून जास्तीत जास्त महिलांना बचत गटांच्या चळवळीत सहभागी करुन घ्यायचे आहे. राज्यातील बचत गट मेहनत करणारे असून त्यांना मजबूत करण्यासाठी शासन म्हणून प्रभावी पाऊले आपल्याला उचलायची आहेत, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.