ऐन सणावारात, तळपत्या उन्हात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर
गेल्या दीड महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच
तेरणी गावातून आक्रोश मोर्चा काढत पदयात्रेचा केला प्रारंभ
जनता दलाच्या नेत्या सौ. स्वाती कोरी व बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी तेरणी गावातून आक्रोश पदयात्रेचा प्रारंभ केला. ऐन मकर संक्रांत सणादिवशीच या कर्मचाऱ्यांनी "आक्रोश" करत शासनाला जागवण्याचे काम केले. गडहिंग्लज नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व जनता दलाच्या नेत्या प्रा. सौ.स्वाती कोरी, अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य सचिव व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाने आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
गेले 48 दिवस झाले राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. धरणे, थाळी नाद, भीक मागो आदी आंदोलने करत या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. नुकतेच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनावर देखील विराट मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते. तरीदेखील शासन दुर्लक्ष करत असल्याने या कर्मचाऱ्यांनी आता आक्रोश मोर्चाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाची सुरुवात तालुक्यातील तेरणी या गावातून करण्यात आली. विविध घोषणा देत हा आक्रोश मोर्चा तेरणी ग्रामपंचायतीवर नेण्यात आला. तेथे कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी सरपंच करवीर उथळे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे लेखी पत्राद्वारे जाहीर करत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
प्रारंभी तेरणी येथील शिवाजी चौकात सर्व अंगणवाडी कर्मचारी एकत्रित आले. या ठिकाणी आक्रोश पदयात्रा रथाचे पूजन सरपंच करवीर उथळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिकनसो बजरु, राजू इंगवले, महादेव तेगनाळे, सिद्धांना देसाई, करवीर इंगवले, सुरेश कतिगार, ग्रामपंचायत सदस्य रमेश पुजेरी, लिंगराज पाटील, शिवलीला संती, सुशाताई तेगनाळे, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अंजना शारबिद्रे, सुरेखा गायकवाड, राजश्री बावन्नावर यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
....आता लढा तीव्र करू : बाळेश नाईक
यावेळी बोलताना बाळेश नाईक म्हणाले, प्रत्येक गावातील लहान मुलांची देखभाल व काळजी घेण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करतात. शासन स्तरावरील विविध कामे देखील यांनाच करावी लागतात. हे कर्मचारी 24 तास कामासाठी बांधले जातात. तरीदेखील शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. या कामाच्या मोबदल्यात या कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही. तुटपुंजा मानधनावर हे कर्मचारी काम करतात. आपल्या न्याय मागण्यासाठी गेले 48 दिवस झाले अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर आहेत. तरी देखील शासन लक्ष देत नाही. आता निकराचा लढा देण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येक गावागावात या आक्रोश पदयात्रेच्या माध्यमातून जाऊन आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.
प्रचंड कामे लादता, मग हक्काचे वेतन का नाही : प्रा. सौ. स्वाती कोरी
जनता दलाच्या नेत्या प्रा. सौ. स्वाती कोरी म्हणाल्या, हक्काचं वेतन मिळालं पाहिजे यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तुटपंजे मानधन देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम शासन करत आहे ते आम्हाला मान्य नाही. वेतनावर असणाऱ्या नोकरदारांपेक्षाही जास्त काम अंगणवाडी कर्मचारी करतात. प्रचंड कामे त्यांच्यावर लादून देखील शासन त्यांना हक्काचे वेतन द्यायला तयार नाही. कायद्याप्रमाणे पगारी नोकरदारांप्रमाणेच त्यांचे काम असून देखील त्यांच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा त्यांनी सरकारला दिला. या आंदोलनात गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बातमीचे व्हिडिओ येथे पहा 👇