एम.आर.युनायटेड करंडक शालेय फुटबॉल स्पर्धेत मिळविले विजेतेपद
शिवराज स्कूलला उपविजेतेपद
![]() |
गडहिंग्लज : विजेत्या होरायझनला करंडक देताना चंद्रकांत गुजर, मल्लिकार्जुन बेल्लद. सोबत संभाजी शिवारे, सचिन शहा, बाळ पोटे पाटील, उत्तम देसाई, प्रविण चव्हाण, संजय कुंभार, प्रशिक्षक दीपक कुपन्नावर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फेत एम. आर हायस्कुलच्या शतकमहोत्सवी निमित्त तेरा वर्षाखालील गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फुटबॉल सामन्यात न्यू होरायझन स्कुलने शिवराज स्कुलचा ३ गोलनी पराभव करून विजेतेपदासह एम. आर. युनायटेड करंडक पटकाविला. दोन गोल नोंदविणारा रोमिल शहा स्पर्धावीरचा मानकरी ठरला. सर्वोदया स्कुलने जागृती हायस्कुलचा २ गोलनी पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला. स्पर्धेत बारा शाळांनी सहभाग घेतला.
अंतिम सामन्यात शिवराज आणि होरायझन यांनी सुरवातीला सावध खेळ केला. पुर्वार्धाच्या नवव्या मिनिटाला शिवराजच्या बचावपटूंचा ढिलाईचा फायदा घेऊन होराय़झनच्या रोमील शहाने पहिला गोल करून खाते उघडले. मध्यंतरानंतर शहाने १९ व्या मिनिटाला मैदानी गोल करून शिवराजला अडचणीत आणले. सामना संपण्यास पाच मिनिटे असताना होराझनच्या ओमकारने सुरेख गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शिवराजच्या आलोक पाटीलची झुंज अपुरी ठरली. सर्वोदयाने आयुष रक्ताडेच्या दोन गोलच्या जोरावर जागृतीला हरवून तिसरा क्रमांक मिळवला.
युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, एम. आर. हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे चंद्रकांत गुजर यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांचा गौरव झाला. प्राचार्य संजय कुंभार, बाळ पोटे पाटील, उत्तम देसाई, सचिन शहा, प्रविण चव्हाण, युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, महादेव पाटील, प्रशांत दड्डीकर यांच्यासह क्रीडाशिक्षक, पालक उपस्थित होते. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. ओमकार जाधव यांनी स्वागत केले. सागर पोवार यांनी आभार मानले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
स्पर्धावीर- रोमिल शहा (होरायझन)
गोलरक्षक – वीर पाटील ( होरायझन)
बचावपटू - सुदेश कडूकर ( सर्वोदया)
मध्यरक्षक - ओमकार चौगुले ( होरायझन)
आघाडीपटू – आलोक पाटील ( शिवराज)