कोल्हापूरच्या "न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी"मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स फार्मसी मध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधून संस्थेच्या विविध शाखेमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गगनबावड्याच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन के.जी पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, दीप प्रज्वलन व छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांनी आपली संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी तसेच संस्थेने खास करून महिलांसाठी फार्मसी शिक्षण उपलब्ध करण्यामागचा उद्देश याची माहिती दिली व पाहुण्यांचे स्वागत केले. तहसीलदार डॉ. शैलजा पाटील म्हणाल्या, महिला म्हणून करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यावर मात कशी करावी, स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकते. त्यासाठी प्रामाणिक कष्ट, जिद्द व अभ्यासाची तयारी असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
चेअरमन के.जी. पाटील यांनी खास महिलांसाठी फार्मसी शिक्षण चालू करण्यामागचा उद्देश, त्यासाठी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सोयी- सुविधा यांचा मागवा घेतला. उच्च दर्जाचे शिक्षण व सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात संस्था कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. यावेळी संचालिका सौ. सविता पाटील यांनी महिलांनी करिअर करत असताना घरची व कौटुंबिक जबाबदारी पार पडताना विश्वास संपादन करून आपले ध्येय व वाटचाल यशस्वी करावी असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थिनींनी कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी संस्थेचे संचालक विनय पाटील, संचालिका व माजी महापौर सौ सई खराडे, विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा. पियुषा निजदार, प्रा. दिव्या शिर्के, सर्व विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पुजाश्री पाटील यांनी केले. आभार प्रा. वैष्णवी निवेकर यांनी मानले.