पाळीव प्राणी, जनावरांवर करतायत हल्ले
ग्रामपंचायत बंदोबस्त करणार की निवेदन देण्याची वाट पाहणार?
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेरणी गावात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गेली कित्येक महिने झाले गावात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरातील पाळीव मांजरे, परसात बांधलेल्या जनावरांवर ही भटकी कुत्री हल्ले करत आहेत. रात्री अपरात्री दुचाकीवरून किंवा चालत येणाऱ्या व्यक्तीला या भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागतो. ग्रामस्थ केवळ या कुत्र्यांना हुसकावु शकतात मात्र यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवेदन देण्याची वाट पाहणार की या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार? अशी विचारणा ग्रामस्थांतून होताना दिसत आहे.
गावातील गल्लोगल्लीत या भटक्या कुत्र्यांचा वावर दिसत आहे. घरात पाळलेली मांजरे, शेळ्या-मेंढ्या, गाईंवर हल्ले करण्याचे धाडस ही भटकी कुत्री करत आहेत. दुकानातून खाऊ घेऊन येणाऱ्या लहान मुलांच्या हातातील खाऊ हिसकावून घेण्यासाठी या मुलांचा पाठलाग देखील ही भटकी कुत्री करत आहेत. या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास ही कुत्री भविष्यात ग्रामस्थांवरही हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामस्थ निवेदन देण्याची वाट पाहणार की या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार? अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत.