जागृती, महागाव, दुंडगे, वि. दि. शिंदे हायस्कूलची विजयी सलामी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): औरनाळ येथील पार्वती हायस्कूलच्या मैदानावर डॉ. घाळी लेदरबॉल करंडक स्पर्धेस शानदार प्रारंभ झाला. विद्या प्रसारक मंडळाचे संचालक महेश घाळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी जागृती, महागाव, दुंडगे, सौ. वि. दि. शिंदे हायस्कूल आदी संघांनी विजयी सलामी दिली.
स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख संपत सावंत यांनी केले. स्पर्धा उदघाटनप्रसंगी मिलिंद कोरी, श्रीरंग तांबे, सुशांत घाळी, शिवाजी अनावरे उपस्थित होते. समालोचन भिमशाप्पा दिवटी यांनी केले.
पहिल्या सत्रात परिश्रम विद्यालय दूंडगेने न्यू होरायझनच्या संघावर 30 धावांनी विजय मिळवला. दूंडगेने सहा षटकात पाच बाद 59 धावा केल्या. 18 चेंडूत 26 धावा करणारा अशोक सामन्याचा मानकरी ठरला. न्यू होरायझनचा भेदक गोलंदाज सिद्धार्थ कुलकर्णी याने 11 धावात तीन बळी घेतले. दुसऱ्या सामन्यात जागृतीने केदारी रेडेकर या संघावर 31 धावांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. जागृतीच्या शुभम साळवेकरने 13 चेंडूत 20 धावा तर अष्टपैलू खेळाडू नैतिक तेलवेकरने 10 धावा व गोलंदाजीत 4 धावात चार बळी घेतले. केदारी रेडेकरच्या चिन्मय देसाईने नाबाद 32 धावा करून एकाकी झुंज दिली. जागृतीने सहा षटकात चार बाद 60 तर प्रत्युत्तर दाखल खेळताना केदारी रेडेकर संघाने सहा षटकात सहा बाद 29 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात महात्मा फुले हायस्कूल महागावने कल्लेश्वर हायस्कूल भडगाववर चाळीस धावांनी दणदणीत विजय मिळविला. महागावच्या ओमकारने 23 चेंडूत 44 धावा केल्या. अटीतटीच्या सामन्यात सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलने साधना हायस्कूलवर विजय मिळविला. साधना हायस्कूलने सहा षटकात पाच बाद 43 धावा केल्या. सौ. वि. दि. शिंदेने सात बाद 44 धावा करून विजय मिळविला. पंच म्हणून महादेव चिलमी, सागर मेतके, राकेश चिलमी, भैय्या हरळीकर, अक्षय गोरुले यांनी काम पाहिले.