सिध्दांत जाधव, महेश राजगोळे ठरले हिरो
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारीपासून होणार स्पर्धा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे फुटबॉल लिगला खेळाडू घेण्यासाठी संघमालकांनी बोली लावली. सलग दुसऱ्यावर्षी सिध्दांत जाधव, महेश राजगोळे या खेळाडूंना सर्वाधिक बोली लागली. सहा संघमालकांनी ८४ खेळाडू बोलीतून निवडले. भडगाव फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दीड तास हा कार्यक्रम रंगला.
बसवेश्वर चौकात खेळाड़ू, पालक आणि क्रिडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडहिंग्लज युनायटेडच्या फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारीपासून भडगाव फुटबॉल लिग होणार आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे.
उपसरपंच रविशंकर बंदी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बोलीचे उदघाटन झाले. गणपतराव पट्टणकुडी, सचिन जाधव, भाग्योदय पाटील, रवि चिलमी, श्रावण मुर्ती, अमृत चोथे उपस्थित होते. महेश हासुरे यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी बोलीच्या नियमांची माहिती दिली.
सर्वप्रथम प्रशिक्षकांसाठी ड्रॉ काढण्यात आला. त्यानंतर आयकॉन खेळाडूंसाठी बोली लागली. यात सिध्दांत जाधवला विक्रमी १६०० गुणावर अव्दिक एफसीने करारबध्द केले.
महेश राजगोळेला (१४००) हसुरे एफसी, अर्थव सावेकरला (१०००) डायनामोज एफसी तर विशाल चौगुले ( एसबी आर्मी एफसी), अनिकेत माने ( अप्पी पाटील एफसी) यांना ८०० गुणावर घेतले.
नवोदितानां प्रोत्साहन मिळावे म्हणून १२ चौदा वर्षाखालील खेळाडूंची ड्रॉद्वारे विभागणी करण्यात आली. गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक आणि आघाडीपटू अशा क्रमाने खेळाडूंची बोली लागली.
प्रत्येक खेळाडू व्यासपीठावर येताच संघ मालकाची चढाओढ लागली होती. संजय पाटील, महादेव चिलमी, प्रतिक पाटील, भाग्यवंत मोरे, अर्जून सावेकर, आप्पासाहेब माने, मंजुनाथ बंदी यांनी बोलीत सहभाग घेतला. पोलीस पाटील उदय पुजारी यांनी आभार मानले. भुपेंद्र कोळी, सौरभ जाधव यांनी सुत्रसंचालन केले.