![]() |
| गडहिंग्लज : मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांना निवेदन देताना वीरपत्नी श्रीमती वृषाली तोरस्कर. |
⛔शासनाने दिलेल्या जागेवर घर बांधण्यासाठी वीरपत्नीला काहीजणांकडून आडकाठी
⛔मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे श्रीमती वृषाली तोरस्कर यांनी दूरध्वनीद्वारे मांडली समस्या
⛔राज ठाकरे यांच्याकडून तातडीने दखल, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची सूचना
⛔श्रीमती वृषाली तोरस्कर यांना न्याय मिळवून देण्याची मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांची ग्वाही
गडहिंग्लज (प्रतिनिधी): देशासाठी शहीद झालेल्या महादेव तोरस्कर यांच्या वीरपत्नी श्रीमती वृषाली तोरस्कर यांना शासनाने दिलेल्या जागेवर घर बांधण्यासाठी काही लोक आडकाठी आणत असल्याने 'कुणी न्याय देता का न्याय'? अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान, वीरपत्नी वृषाली तोरस्कर यांनी न्याय मिळण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दूरध्वनीवरून आपली समस्या मांडली आहे. श्री. ठाकरे यांनी तातडीने दखल घेत मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांना याप्रकरणी लक्ष घालून वीरपत्नी वृषाली तोरस्कर यांना न्याय मिळवून देण्याची सूचना केली आहे. वीरपत्नी वृषाली तोरस्कर यांनी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांना या संदर्भात निवेदन देऊन आपली समस्या मांडली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, माझे पती महादेव बाळू तोरस्कर यांना २००१ साली अरूणाचल प्रदेशात वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. माझे पती शहीद महादेव बाळू तोरस्कर यांनी जीवाची बाजी लावून देशसेवा बजावल्याने शासनाच्यावतीने तत्कालिन जिल्हाधिकार्यांनी सन २००७ साली मला घर बांधण्यासाठी बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) हद्दीत २ गुंठे जागा दिली आहे. त्या जागेचा रितसर पंचनामा, कब्जेपट्टी व अन्य शासकीय प्रक्रिया पूर्ण करून सात बारा ८ अ माझ्या नावे नोंदही करण्यात आला आहे. सन २००८ साली मी त्या ठिकाणी घर बांधण्यास सुरूवात करीत असताना कॉलनीतील काहीजण मी घर बांधू नये म्हणून माझ्याविरोधात जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल माझ्या बाजूनेच लागला आहे. त्याचप्रमाणे पुणे आयुक्त महसूलचा निकालही माझ्या बाजूनेच लागला. मात्र असे असूनही हे लोक मला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. शासनाने मला दिलेल्या जागेवर घर बांधण्यासाठी आडकाठी आणत आहेत.
▶️ बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇🏼
माझा एक मुलगाही देशसेवा बजावण्यासाठी सैन्य दलात दाखल झाला आहे. वास्तविक घर बांधण्यासाठी शासनाने मला जागा दिली आहे. त्यात कोणतीही भाऊबंदकी नाही.पती देशसेवा करताना शहीद झाले. मुलगाही देशसेवा बजावत आहे. असे असताना काही लोक मला त्रास देत आहेत. याबाबत आम्ही सर्व पातळीवर तक्रार, निवेदने दिली आहेत. पण आम्हाला कुणीही न्याय दिलेला नाही. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्यापुढे आम्ही गाऱ्हाणे मांडले. त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्याशी संपर्क साधावा व सर्व हकीकत सांगावे असे सूचवले. आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आम्ही बाळगतो असे वीरपत्नी वृषाली तोरस्कर यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर वीरपत्नी श्रीमती वृषाली तोरस्कर यांची सही आहे.
▶️ बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇🏼

