सार्वजनिक बांधकाम विभाग व मनसेचे नागरिकांकडून कौतुक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या त्या चिंचोळ्या रस्त्याचे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वाहतुकीस अडथळा ठरणारा रस्त्यावरील 'तो दगड' व कठडा हटवत रस्ता खुला केला होता.
गडहिंग्लजमध्ये तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असणारा हा रस्ता मधोमध असलेल्या एका दगडामुळे व अर्धवट स्थितीत ठेवण्यात आलेल्या कठड्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत होता. केवळ दुचाकी वाहनेच तेही कसरतीने येथून जात होती. रस्त्याच्या मध्ये असणारा दगड व कठड्यामुळे वाहतूक अडचणीची होत होती. या परिसरात तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, शासकीय गोदाम, पंचायत समिती, बचत भवन आदी शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची या रस्त्यावरून सतत मोठी वर्दळ असते. त्यामुळे सर्वांच्या दृष्टीनेच हा रस्ता महत्वाचा होता.
या समस्येकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी लक्ष वेधले. आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी जाऊन वाहतुकीस अडथळा ठरणारा तो दगड व कठडा स्वतः श्रमदान करत हटविला होता. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे डांबरीकरण केल्याने वाहतुकीस हा रस्ता पुन्हा सुरळीत झाला आहे. मनसेने या समस्येकडे लक्ष घालून हा प्रश्न सोडविल्याने व सार्वजनिक बांधकाम विभागानेही तत्परता दाखवत रस्ता डांबरीकरण करून नागरिकांची गैरसोय दूर केल्याने समाधान व्यक्त होत आहे.