Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती 


मुंबई : 
विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अंवलबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण राहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य समाधान अवताडे, राजेश टोपे, राहुल कूल, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वाघोली येथील 'द लॉक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल'ने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्याना डांबून ठेवल्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, द लॉक्सिकॉन इंटरनॅशनल शाळेतील साधारण २०० मुलांना शाळा सुटल्यानंतर शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने घरी सोडण्यात आले नव्हते. यानंतर या मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यात येईल.

या शाळेच्या संदर्भात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार  झालेली असताना एकही पालक पोलिस ठाण्यात आलेले नाही. वास्तविक विनाअनुदानित शाळेचे शुल्क किती असावे हे राज्य शासन ठरवत नसल्याने अनेकदा विना अुनदानित शाळांमधील शुल्क संदर्भात अनेक तक्रारी राज्य शासनाकडे येत असतात. येणाऱ्या काळात याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती याबाबत काम करेल. तसेच या प्रश्नाबाबत अधिवेशन संपल्यानंतर एक बैठकही घेण्यात येईल.

केंद्र सरकारने राईट टू एज्युकेशन आणल्यानंतर विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा या आरक्षित ठेवण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने तेथील स्थानिक गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा हा‍ नियम आहे. केंद्र सरकारकडून आरटीई अंतर्गत निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

कोणत्याही शासकीय शाळेतील वीज पुरवठा खंडित होणार नाही

"शासकीय शाळांमधील वीजदेयके न भरल्याने वीज पुरवठा खंडित होणे ही बाब दुर्दैवी आहे. या पुढे  कोणत्याही शासकीय शाळेतील वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येईल," असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुनील राणे, संजय सावकारे, अशोक चव्हाण, ॲड.आशिष शेलार, दिलीप वळसे- पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील वीज पुरवठा याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शाळांमधील वीज पुरवठा खंडित होणार नाही ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळेच वीज पुरवठा खंडित झाल्यावर तातडीने वीज मंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांशी बोलणे करुन यापुढे असे होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. थकित वीज देयकांसाठी प्राथमिक शाळांसह सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडित करु नये, यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल.

शाळांना पुरविण्यात येणाऱ्या विजेसाठी घरगुती वीज दरापेक्षा कमी दर लावला जातो. सध्या सर्व शासकीय शाळांमधील जानेवारी २०२३ पर्यंतची वीज देयके अदा करण्यात आली आहेत.  येणाऱ्या काळात सौरऊर्जेवर शाळा सुरु करण्यावर शासनामार्फत भर देण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनाशी निगडित सार्वजनिक बाबी महत्वाच्या असतात. त्यामुळे थकीत वीज देयकांसाठी, अशा सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार नाही याची काळजी यापुढे घेण्यात येईल. तसेच येत्या काही दिवसात या विषयाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.