सत्याच्या मार्गाने वाटचाल केल्यास सुख,समाधान निश्चित : माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे येथे श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्या वतीने स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ भक्त मंडळ, परिश्रम विद्यालय व दीप इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 'मातृ- पितृ वंदन' कार्यक्रम घेण्यात आला. सिंबायोसिस स्कूलचे माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सायंकाळी हा कार्यक्रम मंदिर स्थळी पार पडला.
सकाळी महारुद्राभिषेक धार्मिक विधी झाला. गेले सात दिवस सुरू असलेल्या स्वामी समर्थ गुरु लीलामृत पारायणची सांगता करण्यात आली. यावेळी दत्ता देशपांडे यांनी जीवनामध्ये आई- वडिलांचे महत्त्व काय असते या विषयावर विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
श्री. देशपांडे म्हणाले, जीवनात सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत. सत्याच्या मार्गाने आपली वाटचाल असले तर सुख आणि समाधान निश्चितपणे लाभते. यावेळी साठहून अधिक आई-वडिल उपस्थित होते. त्यांच्या मुलानी पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले.
विठ्ठल चौगुले यांनी स्वागत केले. बसवराज हिरेमठ यांनी पाद्य पूजा या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. नंदिनी नाईक व वैष्णवी घबाडे या विद्यार्थिनीनी आई-वडिलांचे महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी आप्पासाहेब गुरव, सुरेश देसाई, बसवराज मगदूम, टी.एम . दुंडगे, बाबुराव लोहार, कलया स्वामी यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. दिनकर खवरे यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






