डॉ.जयश्री पाटील व डॉ.आर.डी.पाटील यांचे कार्य कौतुकास्पद: डॉ.अजित पाटोळे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): श्रद्धा हॉस्पिटल, श्रद्धा योग व गर्भसंस्कार केंद्र नेसरीच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त श्रद्धा हॉस्पिटल व योग कल्चर असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय योग स्पर्धा गडहिंग्लज येथे पार पडल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उदघाटन महागावच्या माजी सरपंच सौ.ज्योत्स्ना पताडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ओमकार प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी बोलताना त्यांनी गडहिंग्लज मधील भावी पिढी सक्षम करण्यासाठी योग स्पर्धेची चळवळ व्यापक होणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी योगगुरु प्रा. गुरुलिंग खंदारे व श्रद्धा हॉस्पिटलचे संचालक डॉ.आर.डी. पाटील यांची भाषणे झाली. दरम्यान, डॉ अजित पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण पार पडले.
यावेळी डॉ. पाटोळे यांनी गडहिंग्लज शहरात योग प्रसार व स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डॉ.जयश्री पाटील व डॉ.आर.डी.पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमास सौ.कविता गुरबे, डॉ. सुरेखा पाटोळे, डॉ.माधुरी पाटील, डॉ.अजित कारजगी, डॉ संजय चौंगुले, सौ.नागरत्ना नाईक, सौ. भारती डेळेकर, सौ. श्रेया आजरी, सुधीर उर्फ आप्पा शिवणे, अय्याज बागवान, सचिन पाटील उपस्थित होते. परीक्षक म्हणून सौ.रुपाली लोखंडे, सायली कुरुंदकर, संदीप कुंभार, रोहित कुरुंदकर, अक्षता माईंगडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा गर्भसंस्कार व योग सेंटरच्या संचालिका डॉ.जयश्री पाटील तर स्वागत दिलीपकुमार पाटील यांनी केले. आभार दीप्ती पाटील यांनी तर सूत्रसंचालन गीता मोरे व महेश घुगरे यांनी केले.