बेळगाव (प्रतिनिधी): पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीतील म. गांधी रुग्णालयानजीक दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात रोहित चंद्रकांत आरदाळकर (वय 34, रा. कौलगे ता. गडहिंग्लज ) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. रोहित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रोहित हा (एम. एच. 09 सीएक्स 8033) या दुचाकीवरून गडहिंग्लजहून कोल्हापूरकडे निघाला होता. दरम्यान निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयानजीक आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी झाडावर आदळली. या दुर्घटनेत रोहित याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच शहर फौजदार कृष्णवेणी गुर्लहोसुर, हवालदार गस्ती यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत रोहित याच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे.