नौकुड ग्रामपंचायत व विद्यार्थ्यांच्या वतीने गडहिंग्लज आगाराला निवेदन
बसर्गे बसला गर्दी होत असल्याने नौकुडच्या विद्यार्थ्यांना दरवाज्यापर्यंत उभे राहून करावा लागतो प्रवास
सायंकाळी ४ ची गडहिंग्लज- नौकुड बस देखील येणेचवंडी फाट्यापर्यंत सोडण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सकाळी चिंचेवाडीपर्यंत सोडण्यात येणारी एसटी बस नौकूडपर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत व येथील विद्यार्थ्यांच्या वतीने आगार प्रमुख यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. बसर्गे बसला प्रचंड गर्दी होत असल्याने नौकुड येथील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत याकडे या निवेदनातून सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी आगाराचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नौकुड येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दररोज शाळा व महाविद्यालयांना गडहिंग्लज येथे जातात. सकाळी सव्वा सहा वाजता बसर्गेवरून येणाऱ्या मुक्काम बसला नौकूड येथील विद्यार्थी जातात. मात्र या बसला प्रचंड गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना दरवाज्यापर्यंत उभे राहून गडहिंग्लजपर्यंत प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या गर्दीचा विचार करता आगाराने सकाळी चिंचेवाडीपर्यंत सोडण्यात येणारी एसटी बस नौकूडपर्यंत सोडण्यात यावी. यामुळे सकाळी सव्वा सहा वाजताच्या बसर्गे बसवरील गर्दीचा ताण कमी होऊन विद्यार्थ्यांचा प्रवासही सुखकर होण्यास मदत होईल.
तसेच नौकुड येथील विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी नंदनवाड येथील शिवराय हायस्कूलला जातात. शाळा सुटल्यानंतर घरी येताना सायंकाळी या विद्यार्थ्यांना एसटी बसची सोय नसल्याने पायपीट करत नौकुडपर्यंत यावे लागते. त्यामुळे गडहिंग्लजहुन दररोज नौकुडपर्यंत सोडण्यात येणारी बस येणेचवंडी फाट्यापर्यंत सोडण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांची पायपीट यामुळे थांबेल अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी या निवेदनातून दिला आहे.
या निवेदनावर सरपंच शुक्राचार्य चोथे, ग्रामसेवक यांच्यासह साक्षी चव्हाण, तृप्ती चव्हाण, पूजा चोथे, पुष्पा चव्हाण, सारिका बिरंजे, गायत्री लोहार, सानिका चोथे, सानिका गुरव, मधुरा गुरव, भाग्यश्री घस्ते, सानिका बिरंजे, स्नेहल मांगले, सपना मांगले, वैष्णवी दरेकर, आरती गोईलकर, रेखा कोरवी, मानसी लोहार, अंकिता नाईक, शुभांगी बिरंजे, सानिका मांगले,अस्मिता मांगले, अंबिका गोईलकर, अनिकेत मांगले, राजेश मांगले, शैलेश मांगले, प्रतीक मांगले, केतन मांगले, पृथ्वीराज पाटील, अंकुश पाटील, उत्तम गुरव, स्वप्निल चौगुले, रोहन गोईलकर, निखिल गुरव, भीमा कोरवी,अमित घस्ते, स्वराज दरेकर आदी विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.