Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गायरान अतिक्रमण व महामार्गप्रश्नी गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर जनता दलाचा मोर्चा

गडहिंग्लज : मोर्चासमोर बोलताना माजी आमदार श्रीपतराव शिंदे. यावेळी उपस्थित जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह इतर.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गायरान जमिनीवरील अतिक्रमण केलेल्या घरांचे नियमितीकरण करावे, संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्गातील बाधितांना नुकसान भरपाई मिळावी या दोन प्रश्नांसाठी जनता दलाच्या वतीने माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

येथील महालक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. बाजारपेठ व मुख्य मार्गावरून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, माजी नगराध्यक्षा  सौ.स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, रामा जाधव, काशिनाथ देवगोंडा, बी.जी. स्वामी यांची भाषणे झाली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, गायरान अतिक्रमण करून घर बांधलेल्या लोकांना उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, खणदाळ, औरनाळ, नूल, अत्याळ, कडगाव, ऐनापुर, गिजवणे, हेब्बाळ कसबा नूल, सांबरे, जरळी, मुगळी, शेंद्री, बड्याचीवाडी, करंबळी, बसर्गे  बुद्रुक, वडरगे, सरोळी, कानडेवाडी, भडगाव, नरेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, तेरणी, इंचनाळ, अरळगुंडी, हुनगिनहाळ, नेसरी, हडलगे, उंबरवाडी, इदरगुच्ची, कुमरी, हरळी अशा अनेक गावातील अतिक्रमणे काढण्यासाठी नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी 1955 पासून आजतागायत लाखो रुपये खर्च करून घरे बांधलेली आहेत, तेव्हापासून ग्रामपंचायतीला पाणीपट्टी, घरफाळा अशा पद्धतीचे कर भरत आहेत. प्रत्येक गावामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, खासदार व आमदार यांच्या निधीतून रस्ते, गटारी, नळपाणी पुरवठा योजना, शाळा, अंगणवाड्या, देवालय उभारलेले आहेत. निराधार होण्याच्या भीतीमुळे घरामध्ये तीन-चार पिढ्या वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणग्रस्त कुटुंबांची झोपच उडालेली आहे.

अतिक्रमण आदेशाला स्थगिती देण्यात यावी, शासनाच्या 2011 पूर्वीचे अतिक्रमण कायम करण्याच्या आदेशात दुरुस्ती करून 2021 पर्यंतची अतिक्रमणे कायम करावीत, गावच्या विकासासाठी गावठाण विस्तार झाला नसल्याने कुटुंबधारकांनी व गावातील दुर्बल घटकांतील नागरिकांनी जमिनीअभावी शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून निवासी कारणासाठी व छोट्या उद्योगांसाठी वापरलेली अतिक्रमित जमीन अतिक्रमण निकषातून वगळण्याबाबत विचार व्हावा, ज्या कुटुंबाच्या काही सदस्यांची नावे त्याच ग्रामपंचायत, शेतात घर असेल तर अशा कुटुंबांना सन 2000 पासून अतिक्रमण करून राहत असेल तर प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार येणाऱ्या किमती प्रमाणे आणि जर 2000 नंतर परंतु 2011 पर्यंत अतिक्रमण करून राहत असतील तर प्रचलित वार्षिकदर विवरण पत्रानुसार जागेचे वाटप करावे, गायरान जमिनीवर निवासी व इतर प्रयोजनासाठी एकत्रित नियमानुकुल करण्यात येणारी जागेची 2000 चौरस फूट मर्यादेची अट शिथिल करावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

संकेश्वर- आंबोली -बांदा महामार्ग बाधिताना भरपाई द्या 

संकेश्वर पासून आंबोलीला जाणाऱ्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामध्ये शेकडो वर्षे उभे असलेले महाकाय वटवृक्ष जमीनदोस्त झालेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे सपाटीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे. ते करत असताना ज्या त्या गाव, तालुका ठिकाणी कोणत्याही परिस्थितीची सूचना व आदेशाचे प्रत पाहायला  मिळालेली नाही. महामार्गाचे काम करण्यापूर्वी त्या रस्त्याची मोजणी करून किती रुंदी व लांबीचा रस्ता होणार आहे याची पुसटशीही कल्पना दोन्ही बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मालकीची घरे, उद्योग व्यवसाय यासाठी उभारलेली दुकाने, रस्त्याच्या कडेला असणारी झाडे, आयुष्याची पुंजी म्हणून जमिनीचा तुकडा रस्त्या लागत आहे. या महामार्गामुळे जमीन व घरे जात असल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत.

रस्त्यासाठी घेणाऱ्या जमिनीला रेडीरेकनर नुसार पाचपट नुकसान भरपाई मिळावी, हा रस्ता रुंद करत असताना रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याची शेती व घरे जाणार आहेत त्याची नेमकी माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही ही माहिती तातडीने देऊन त्याची नुकसान भरपाई मिळावी, या रस्त्यावर एकूण 34 पूल आहेत, मोठमोठी गावी आहेत तेथे नेमके काय होणार,  काही गावांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाव आहे त्यासाठी सर्विस रोड होणार आहे का? याचीही माहिती नाही, गडहिंग्लज, आजरा शहरातून हा रस्ता जाणार आहे. जाणाऱ्या रस्त्याची आखणी झाली पाहिजे व नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मोर्चामध्ये गायरान अतिक्रमणग्रस्त तसेच संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.