गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसह गडहिंग्लज उपविभागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यात यावीत या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असून गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर उद्या दिनांक 24 रोजी "आक्रोश मोर्चा" काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना राजेंद्र गड्यानावर म्हणाले, गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी शासनाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. गडहिंग्लज तालुक्यात जवळपास 1400 पेक्षाही जास्त गायरानातील अतिक्रमणे आहेत. विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये स्थलांतर होत या गायरानांमध्ये लोकांनी आपली घरे बांधली आहेत. ही अतिक्रमणे कायम करण्यात यावीत यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. गायरानातील सर्व अतिक्रमणे शासनाने कायद्यात बदल करून कायम करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक 24 नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर संकेश्वर- आंबोली- बांदा या महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर घटकांना पाचपट नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीकडेही या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे श्री. गड्यानावर यांनी सांगितले.