गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील गायरानावरील रहिवाशी अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात शासकीय जमिनीवर रहिवासी घरे उभारली गेली आहेत. सद्यस्थितीला शासनाकडून उपरोक्त मिळकत धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून लोक सदर घरात राहत असून त्यांना अचानक बेघर करणे हे योग्य नाही. सदर रहिवाशी घरे ग्रामपंचायतीनी ठराव करून लोकसंख्या वाढीची अडचणी सोडवण्यासाठी दिलेल्या जागेवर बांधलेली आहेत. सदर गायरानातील घरे यांच्या शर्थभंगाचे प्रस्ताव मंजूर करून रेडी रेकनरच्या 50 टक्के दर आकारून नियमित करून घ्यावे, जरूर तर रस्त्यास अडवणूक करणाऱ्या बांधकामाना हटविण्याची नोटीस द्यावी, उपरोक्त गायरानाची महसूल विभागामार्फत शासकीय मोजणी करावी व यासंबंधी सर्वस्वी अधिकार ग्रामसभेकडे द्यावे आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर बसवराज आजरी, रणजीत शिंदे, विक्रम शिंदे, तानाजी चौगुले यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.