गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे फाट्यानजीक शेतकऱ्यांनी बंद पडले.
संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आजरा तालुक्यात महामार्गाचे काम बंद पाडले होते. महामार्ग बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे काय होणार असा प्रश्न आहे. सध्याचा रस्ता, त्यांच्या बाजूपट्टीची हद्द आजही शेतकऱ्यांच्या नावावर आहे. मात्र त्यांना नोटिसा न देता काम चालू केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कडेची झाडे तोडण्यात आली, मात्र याच रस्त्यावर वन खात्याच्या हद्दीतून रस्ता गेला आहे त्या हद्दीत वन खात्याने परवानगी न दिल्याने एकही झाड तोडलेले नाही अगर त्यांच्या बाजू पट्टीतून कोणतेही सफाईचे काम चालू नाही. या पार्श्वभूमीवर दिनांक 15 रोजी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडत आंदोलन केले होते. त्यानंतर आजरा येथील तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिले होते. या महामार्गावर टोल बसणार असल्याचेही यावेळी महामार्गाचे उपअभियंता टी.एस.शिरगुपी यांनी सांगितले होते. भूसंपादन प्रक्रिया झाल्याशिवाय काम करू देणार नाही असे शेतकऱ्यांनी यावेळी बजावले होते. आज गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे फाट्यावर महामार्गाचे काम चालू होते. ते येथील शेतकऱ्यांनी जाऊन बंद पाडले.
यावेळी शिवाजी देसाई, बाळासो देसाई, शिवाजी इंगळे,जयवंत थोरवतकर, दत्ता कदम, दत्ता नेसरकर, हरी चव्हाण यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.