Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे 1 डिसेंबरला गडहिंग्लजमध्ये धरणे आंदोलन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी, घर मालक, दुकानदार यांच्या पुनर्वसनासाठी दिनांक 1 डिसेंबर रोजी गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांनी दिली आहे. या संदर्भातील निवेदन  प्रांत अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर- बांदा महामार्ग हा चार पदरी होणार असल्याचे समजते. महामार्गाचे कामही चालू झाले असून रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे तोडण्यात आली आहेत. साईडपट्टीची जागा ही शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्याची वहिवाट त्या- त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचीच आहे. मात्र सध्या दोन पदरी म्हणजे बारा मीटर रुंदीचा रस्ता होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगत आहेत. हा रस्ता गडहिंग्लज व आजरा शहरातून जाणार आहे. हा रस्ता करत असताना दोन्ही शहरांना अवजड वाहने  बाहेरून जाण्यासाठी बायपास रस्ता झाला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याची शेताची व घर असल्यास घराचे जागेची मोजमाप करून बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या व इतर मागण्यांसाठी महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 1 डिसेंबर रोजी गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, या दिवशी भूसंपादनचे अधिकारी, वनविभाग, महामार्ग विभाग व इतर संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच संयुक्त मोजणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर कॉ.शिवाजी गुरव, संजय तर्डेकर, प्रा. सुरेश वडराळे, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवतकर, आनंदा येसणे, शिवाजी देसाई, संजय नाईक, विजय आजगेकर, हरिराम चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.