गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ.प्रकाश शहापूरकर तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी प्रकाश जगताप यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी श्री.जगताप यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. दरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ते व कामगारांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
चेअरमन पदासाठी डॉ. प्रकाश शहापूरकर यांना सूचक व अनुमोदक संचालक सतीश पाटील व प्रकाश पताडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश चव्हाण यांना सूचक व अनुमोदक संचालक सदानंद हत्तरकी व विद्याधर गुरबे हे होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, साखर कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कारखाना चालवताना कोणत्याही प्रकारचे राजकारण आणले जाणार नाही. कामगारांचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील. माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे आर्थिक पाठबळ साखर कारखान्यावर असणार आहे. साखर कारखाना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विस्तारीकरण करणे खूप गरजेचे असून लवकरच इथेनॉल प्रकल्प सुरू केले जाईल असे त्यांनी सांगितले.
व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण म्हणाले, सर्व सभासदांनी आमदार मुश्रीफ, डॉ. शहापूरकर यांच्यावर विश्वास ठेवून साखर कारखान्याची सत्ता समविचारी आघाडीच्या हातात एकहाती दिली आहे. सद्यस्थितीत साखर कारखान्याची काय परिस्थिती आहे हे सर्व सभासदांना माहीत आहेच. लवकरच हा कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी डॉ. शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमास सर्व संचालक, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण यांनी मानले.