स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर यांची माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्ग प्रश्नी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी संबंधित सर्व अधिकारी व बाधित शेतकरी यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज येथील नगरपरिषदेच्या शाहू सभागृहात दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर यांनी "गडहिंग्लज बुलेटीन"शी बोलताना दिली.
यावेळी बोलताना राजेंद्र गड्यानावर म्हणाले, 28 रोजी होणाऱ्या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता, गडहिंग्लज व आजरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, हिटणी नाका ते आजरा तालुक्यातील घाटकरवाडी पर्यंतचे महामार्गात बाधित होणारे शेतकरी उपस्थित राहणार आहेत. सध्या गडहिंग्लज व आजरा तालुक्यात महामार्गाचे काम दिनांक 28 रोजीची बैठक होईपर्यंत करण्यात येऊ नये असे बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या महामार्ग संदर्भात गेल्या सहा महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठपुरावा करत आहे. संकेश्वर- बांदा महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 व 17 ला जोडणारा कॉरिडॉर आहे. हा महामार्ग गडहिंग्लज तालुक्यात मुत्नाळ, निलजी, हेब्बाळ, दूंडगे, गडहिंग्लज शहर, गिजवणे, अत्याळ व बेळगुंदी फाटा या गावांच्या हद्दीतून जाणार आहे. हा मार्ग जेथून जाणार आहे त्या मार्गावर एकूण 35 लहान- मोठे महत्त्वाचे पूल असून पैकी 25 पूल हे हिटणी ते घाटकरवाडी या दरम्यान आहेत. याबाबतचा आराखडा कसा असणार आहे तसेच या मार्गाचे काम करत असताना या गावांच्या हद्दीत असणाऱ्या वसाहती, विविध घटक यांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये याचा विचार या बैठकीत केला जाणार आहे. या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई शासनाने द्यावी ही आमची आग्रही मागणी आहे. या बैठकीला महामार्ग बाधित शेतकरी व गडहिंग्लज शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री.गड्यानावर यांनी केले आहे.