(छायाचित्र: अशपाक किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवू नयेत, संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई मिळावी या दोन मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयावर "आक्रोश मोर्चा" काढण्यात आला.
![]() |
(छायाचित्र: अशपाक किल्लेदार) |
शिवाजी चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. नेहरू चौक, बाजारपेठ, मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आणण्यात आला. येथे आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, रमेश आरबोळे, कॉम्रेड शिवाजी गुरव, तमाना पाटील, जयवंत थोरवतकर, तानाजी देसाई आदींची भाषणे झाली. त्यानंतर प्रांताधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
![]() |
(छायाचित्र: अशपाक किल्लेदार) |
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज विभागातील गायरान अतिक्रमण हटविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आले आहेत. गायरान जमिनीमध्ये हजारो गोरगरीब कुटुंबे गेली किती वर्षे राहत आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने कारवाईचा बडगा संबंधित गोरगरिबांच्या घरावर उगारला आहे. सदरची घरे पाडण्याच्या नोटिसा प्राप्त झाले आहेत. वास्तविक पाहता अनेक राजकारण्यांनी अनेक गायरान जमिनी हडप केले आहेत, त्यावर शासनाने कधीच कारवाई केल्याचे दिसले नाही. गरिबांची घरे पडल्यास हजारो कुटुंब उघड्यावर पडणार आहेत. मग त्यांनी राहायचे कुठे? त्यांना निवारा कोण देणार? आदी सवाल या निवेदनात करण्यात आले आहेत. गायरान जमिनीमधील घरे पाडण्यास आमचा तीव्र विरोध असून अतिक्रमण हटविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
![]() |
(छायाचित्र: अशपाक किल्लेदार) |
तसेच संकेश्वर- बांदा महामार्ग प्रश्नाकडे देखील या निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. संकेश्वर- बांदा या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. पुढील दृष्टीकोनातून पाहता या मार्गावर येणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई देण्यात यावे, घरे, विहिरी, दुकाने आदींचे योग्य ते मूल्यमापन केले जावे, शेतकऱ्यांच्या तसेच सर्वांच्या दृष्टीने सर्व सोयीनीयुक्त रस्ता केला जावा, सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 ला जोडणारा कॉरिडॉर आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पाहता अतिशय महत्त्वाचा रस्ता होणार असून सर्व तक्रारींचे योग्य प्रकारे निरसन करण्यात यावे, शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होता कामा नये, जमिनीचा मोबदला हा पाचपट दिला जावा, राज्य सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये केलेली बेकायदेशीर दुरुस्ती आम्हाला कदापी मान्य नाही, पूर्वीच्या कायद्याला अनुसरून जागेचे हस्तांतरण करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
![]() |
(छायाचित्र: अशपाक किल्लेदार) |
या निवेदनावर माजी खासदार राजू शेट्टी, राजेंद्र गड्यानावर, तानाजी देसाई, सुभाष पाटील, ॲड. आप्पासाहेब जाधव, अशोक पाटील, बसवराज मुत्नाळे, अजित धनगर आदींच्या सह्या आहेत. या आंदोलनात गायरान अतिक्रमणग्रस्त व संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.