⛔ 'एसजीएम'च्या विद्यार्थ्यांची गडहिंग्लज आगाराकडे निवेदनातून मागणी
⛔ पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापकांना निवेदन
![]() |
गडहिंग्लज : आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांना निवेदन देताना 'एसजीएम' येथील विद्यार्थी. यावेळी उपस्थित पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज- बसर्गे मार्गावर दुपारी दोननंतर नियमित बस फेऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी संत गजानन महाराज शिक्षण समूह येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी श्री. नाईक यांनी आगार व्यवस्थापक यांना याबाबत तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी असे सांगून 'एसजीएम' येथील विद्यार्थ्यांचे बसला होणाऱ्या गर्दीमुळे होणारे हाल याकडे लक्ष वेधले.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज पूर्व भागातील बसर्गे, हलकर्णी, तेरणी, बुगडीकट्टी परिसरातील 300 च्या वर विद्यार्थी संत गजानन महाराज शिक्षण समूह येथे अभियांत्रिकी तसेच विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. दररोज सकाळच्या सत्रात प्रत्येक गावातून बसची सोय असल्याने विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचतात. दुपारी दोन नंतर कॉलेज सुटते. यावेळी गडहिंग्लज येथून येणाऱ्या बसमधून गावी पोहोचणे हा पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतो, मात्र गडहिंग्लजमधून निघणाऱ्या सर्वच बसेस प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेले असतात त्यामुळे एसजीएम वरील विद्यार्थ्यांना न घेताच काही वेळा या बसेस निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सायंकाळपर्यंत खोळंबा होतो. काही बस या ठिकाणी थांबल्याच तर अगोदरच बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने दाटीवाटीने घुसणे हा एकच पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतो. यामध्ये विशेष करून मुलींना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षाही जास्त प्रवासी भरल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे दुपारी दोननंतर गडहिंग्लजहुन बसर्गेपर्यंत निघणाऱ्या नियमित बस फेऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. बस फेऱ्यांची संख्या वाढवल्यास गर्दीचा ताण कमी होऊन सर्व विद्यार्थ्यांना सुखकर प्रवास करत गावी पोहोचणे शक्य होईल. आगाराने विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन तातडीने या मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, संपत्ता घुळाणावर, स्नेहा थोरात, मारुती नाईक, प्रमोद केसरकर यांच्यासह 66 विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.