![]() |
गडहिंग्लज: स्टेट बँकेचे शाखा अधिकारी उमेश म्हस्के यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. एस. एम. कदम. यावेळी उपस्थित निखिल कमते, अमर कुडित्रेकर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात स्टेट बँक ऑफ इंडिया गडहिंग्लज शाखेच्या वतीने आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते.
प्रारंभी बीबीए विभाग प्रमुख प्रा. आर.डी.कमते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडिया गडहिंग्लज शाखेचे शाखाधिकारी उमेश म्हस्के यांनी बँकेच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध योजना, गृह, वाहन, सोनेतारण, वैयक्तिक कर्ज तसेच शेती निगडित व्यवसायासाठी कर्ज तसेच आरोग्य विम्याची उपलब्ध सुविधा बाबत सविस्तर मार्गदर्शन करून ग्राहकांनी या योजनेचा व बँकेच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
बँकेचे अधिकारी निखिल कमते यांनी आपल्या कष्टाचा पैसा कसा वाचवावा, त्याची बचत कशी करावी तसेच खर्च व बचत यांचा ताळमेळ, आपली गुंतवणूक ही भविष्यासाठी व येणाऱ्या अडचणींसाठी कशी महत्त्वाची आहे याची माहिती सांगून सध्या उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायाबाबत आवश्यक ती माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. योग्य त्या सल्ल्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
बँकेचे अधिकारी अमर कुडित्रेकर यांनी आरोग्य विम्याचे महत्व सांगून बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या योजनेची माहिती दिली. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी आजच्या घडीला सर्वांनी आर्थिकबाबत जागृत राहणे गरजेचे आहे. काळाबरोबर आपणही अपडेट राहणे आवश्यक आहे. खर्चाचा व मिळवणाऱ्या रकमेचा ताळमेळ बसविण्यासाठी आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे. आपल्या बचतीला प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास विना अनुदानित विभागाचे समन्वयक प्रा. आझाद पटेल, प्रा.के.एस. देसाई यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.