संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम महामार्ग बाधित शेतकरी संघटनेने बंद पाडले
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम करत असताना दुंडगे गावच्या हद्दीत रस्त्याच्या साईड पट्टीमध्ये असणारी शेतीपाण्याची पाईपलाईन फोडण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले. संघटनेला याची माहिती दिल्यानंतर सदर काम बंद पाडण्यात आले.
महामार्गाचे दुंडगे हद्दीत काम सुरू होते. या ठिकाणी साईडपट्टीमध्ये बाळाप्पा व साताप्पा नाईक यांच्या शेतीची पाण्याची पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन काम सुरू असताना फुटल्यानंतर शेतकरी संतप्त झाले. दरम्यान, महामार्गाचे काम पुन्हा चालू केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांना शेतकऱ्यांनी दिली. कॉम्रेड गुरव यांनी संघटनेचे कार्यकर्ते जयवंत थोरवतकर यांना सांगितल्यानंतर श्री. थोरवतकर व अण्णासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम बंद पाडण्यात आले.
अशीच ठिकाणे बदलून काम सुरू केल्यास पुन्हा काम बंद केले जाईल. उद्यापासून संकेश्वर ते आंबोली पर्यंत महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन करून गस्त घातली जाणार आहे. ही गस्ती पथके काम चालू होताच शेतकऱ्यांना एकत्रित करून काम बंद आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याची जमीन मोजून सर्वे केला जात नाही, घरांचा सर्वे केला जात नाही तोपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचे काम करू दिले जाणार नाही असा निर्धार संघटनेने केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली.
दरम्यान, कॉम्रेड गुरव यांनी प्रांताधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत माहिती दिल्याचे सांगितले.