Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान : डॉ.अच्युत माने

🔘गडहिंग्‍लजला डी. के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "दिनकर मास्तर सृजनशील शिक्षक पुस्कार" वितरण सोहळा संपन्न

🔘शिक्षण हे यज्ञ आहे, त्यात वाईटाचा नाश तर चांगल्याचा विकास होतो : ॲड. श्रीपतराव शिंदे 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
 समाजाची जडणघडण करण्याची मोठी जबाबदारी ही शिक्षकांवर असते. कृतज्ञतेची भावना कमी होत चाललेल्या आजच्या काळात  मूल्यांची रुजवणुक करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाला विवेकाची जोड असणे आवश्यक असून मूल्यांची जोपासना करत उत्तम माणूस घडवण्याचे कार्य केवळ शिक्षकच करू शकतात असे प्रतिपादन ज्येष्ठ साहत्यिक डॉ.अच्युत माने यांनी केले.

गडहिंग्‍लज येथील  डी. के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "दिनकर मास्तर सृजनशील शिक्षक पुस्कार वितरण" समारंभात ते  बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड.श्रीपतराव शिंदे होते. यावेळी दिनकर मास्तर सृजनशील शिक्षक पुरस्काराने राजेंद्र सुतार (कुमार भवन शाळा पुष्पनगर) यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी बोलताना डॉ.माने पुढे म्हणाले, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांची दुसरी आई असते. उपक्रमशीलता ही ओढून-ताणून येत नाही, तर ती अंगी असावी लागते. त्यासाठी दृढ निर्धार व निर्मळ मन असणे आवश्यक आहे तरच सृजनशीलतेला वाव मिळतो.

माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे म्हणाले की, आजच्या घडीला शिक्षण महाग होत चालले असून शिक्षण संस्थानी पुढे येत सर्वसामान्य गरीब, मोलमजुरी करणाऱ्या व शिक्षणापासून वंचित घटकांसाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. शिक्षण हे यज्ञ आहे त्यात वाईटाचा नाश तर चांगल्याचा विकास होतो. यावेळी सुभाष धुमे यांनी मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व दिनकर मास्तर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी रायकर यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संजीवनी मोहिते यांनी करून दिला. डॉ. बाळगोंडा पाटील यांनी पुरस्काराची रूपरेखा स्पष्ट केली. यावेळी उत्कृष्ट  शिक्षक म्हणून कार्यरत असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शिक्षक अर्जुन हराडे व संजीवनी मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. दिनकर मास्तर सृजनशील शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरलेले राजेंद्र सुतार (कुमार भवन शाळा पुष्पनगर) यांचा ज्येष्ठ साहत्यिक डॉ.अच्युत माने यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सन्मानपत्राचे वाचन तानाजी चौगुले यांनी केले.

कार्यक्रमास उर्मिलादेवी शिंदे , संजीवनी पोवार, बाळासाहेब खोचगे, डॉ.टी. वाय. पटेल, डी. के.परिट , श्री.चव्हाण, संजय देसाई, अनिल पाटील, सचिन शिंदे, सुभाष सुतार, दिपाली शिंदे, क्रांती शिवणे, महेश पाटील, श्री. आमनगी यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे आजी- माजी विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष आंबी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.