40 लाख खर्चून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाच घंटा गाड्यांचे देखील लोकार्पण
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : माजी ग्रामविकास व कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून गडहिंग्लज शहरासाठी मंजूर झालेल्या 1 कोटी 30 लाखांच्या विविध विकास कामांचे उदघाटन माजी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रस्त्यांसाठी 80 लाख, विशेष रस्ते अनुदान योजनेतून 20 लाख तर एम.आर. हायस्कूल मैदानावरील प्रेक्षक गॅलरीसाठी 30 लाख रुपये आदी विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. तसेच यावेळी स्वच्छ सुंदर गडहिंग्लजसाठी 40 लाखांच्या निधीतून 5 घंटा गाड्यांचे लोकार्पण देखील करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. देशाच्या नकाशावर गडहिंग्लज मोठ्या अभिमानाने झळकेल असा विकास करण्याची ग्वाही देखील मुश्रीफ यांनी दिली. ते म्हणाले, माझ्या कागल मतदार संघातील प्रत्येक गावांचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. मतदारसंघातील सर्व प्रश्न वेळोवेळी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही करीतच राहीन. माझ्या मतदार संघातील कागल, मुरगुड व गडहिंग्लज या नगरपालिकाना विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही माझे सहकार्य असेच राहील. गडहिंग्लज साखर कारखाना सुरळीत चालण्यासाठी प्रसंगी आपण जीवाची बाजी लावू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे, माजी नगरसेवक किरणराव कदम, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, माजी नगरसेवक हारुण सय्यद, दानिविपचे रमजान आत्तार यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.