Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे दिला चिन्हांचा पर्याय

लवकरात लवकर चिन्ह देण्याची आयोगाकडे विनंती

"मी डगमगलेलो नाही, माझ्यात आत्मविश्वास ठासून भरला आहे"


मुंबई (प्रतिनिधी): मी डगमगलेलो नाही, माझ्यात भरपूर  आत्मविश्वास ठासून भरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच माझी ओळख आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपवर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पंचवीस मिनिटे जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे त्रिशूळ, उगवता सूर्य व मशाल या तीन चिन्हांचा पर्याय दिला असल्याचे सांगितले. 

यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आपला दसरा मेळावा होऊ नये म्हणून "खोकासुरानी" प्रयत्न केले. मात्र हा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. याबद्दल त्यांनी  शिवसैनिक व जनतेचे आभार मानले. दसऱ्या दिवशी दोन मेळावे झाले, एक साधासुधा दुसरा पंचतारांकित असे सांगत शिंदे गटावर त्यांनी टीकेचे बाण सोडले. मुख्यमंत्रीपद ज्याना पाहिजे होतं त्यांनी ते घेतलं. सगळं काही देऊनही काहीजण नाराज झाले. आता तर चाळीस डोक्याच्या रावणाने प्रभू रामाचं धनुष्य गोठवल. आता मात्र आमच्या  सहनशीलतेचा अंत झाला आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यांच्या पाठीशी असणाऱ्या महाशक्तीला यामुळे आनंद होत आहे. उलट्या काळजाच्या लोकांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली अशी जहरी टीका देखील ठाकरे यांनी केली. 

ठाकरे पुढे म्हणाले, प्रबोधनकारांनी पक्षाचे नाव शिवसेना ठेवले. अनेक शिवसैनिकांच्या श्रमामुळे शिवसेना वाढीस लागली आहे. सेनेसाठी अनेकांनी तुरुंगवास भोगला. यापुढेही शिवसैनिक लढत राहतील.शिवसेना म्हणजे गोठवलेल रक्त नाही. शिवसेना म्हणजे तापलेलं व सळसळत रक्त आहे. हिंमत असेल तर बाळासाहेबांच नाव न वापरता निवडणूका लढवून दाखवाव्यात. असे थेट आव्हान देखील ठाकरे यांनी दिली. रात्र वैऱ्याची आहे जागे राहा असे आवाहन देखील ठाकरे यांनी शेवटी शिवसैनिकांना  केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.