"गडहिंग्लज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार" वितरण सोहळा उत्साहात
सौ.सीमा पाटील, सौ.नम्रता पोवार, सौ. प्रेमलता कदम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भावी पिढी घडविण्यात शिक्षकाचा मोलाचा वाटा असतो. समाजाला एक चांगली दिशा देण्याचे काम शिक्षक करू शकतो असे सांगत शिक्षकाला हृदयाची भाषा कळली पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक 'रिंगाण' कार कृष्णात खोत यांनी केले.
पंचायत समिती गडहिंग्लज व आदिती फौंडेशन नंदनवाड यांच्या संयुक्त विद्यमाने "गडहिंग्लज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार" वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम सिंबायोसिस स्कूल, हरळी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिती फौंडेशनचे अध्यक्ष दिनकर सावेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शरद मगर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक गीत मंचच्या स्वागत गीत, ईशस्तवन, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सौ.सीमा पाटील, सौ.नम्रता पोवार व सौ. प्रेमलता कदम यांना गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ.अर्चना देसाई तसेच प्रज्ञाशोध परीक्षा व विज्ञान प्रदर्शनात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. आदिती फौंडेशनचे अध्यक्ष दिनकर सावेकर यांनी शिक्षकांनी मायेची ममता दिल्याने मी महसूल अधिकारी झालो व राष्ट्रपती पदकला गवसणी घालू शकलो असे सांगितले.
कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर, आदिती फौंडेशनचे सचिव आनंदा वाघराळकर, महेश घुगरे, संभाजी कार्वेकर यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व नंदनवाड ग्रामस्थ उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय विलास माळी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती कोलूनकर व गीता मोरे यांनी केले. आभार चंद्रकांत जोशी यांनी मानले.