शिवराज महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीमध्ये प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी व पालक हे महत्वाचे घटक आहेत. यांच्या एकत्रित प्रयत्नाने संस्थेच्या वाटचालीला खरे बळ मिळते. त्या दृष्टीने विचार करून उच्च शिक्षणात प्रगती साधता येते. यासाठी सर्व घटकांबरोबरच प्राध्यापकांनी आपल्या संस्थेसाठी मोलाचे योगदान देणे आवश्यक आहे. तरच आपल्या संस्थेची वाटचाल मजबूत होईल असे प्रतिपादन राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानचे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित व्याख्यानात उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता हमीमध्ये महाविद्यालयातील प्रमुख घटकांची मोलाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कोरडे होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डी. यु.जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाब्रेकर म्हणाले, आपणास संधी मिळत आहे याचा विचार घेऊन आपण नेहमी अपडेट राहणे आवश्यक आहे. आपल्या क्षेत्रातील ज्ञान मिळवून त्याचा चांगल्या पद्धतीने विनियोग करणे गरजेचे आहे. आपल्याकडे बौद्धिक क्षमता खूप आहे परंतु गुणवत्ता महत्त्वाची आहे. काळाबरोबर आपल्या सर्वांना बदलावे लागेल. बदलांचा स्वीकार करून आपण टाकलेला प्रत्येक पाऊल जिद्दीचा व महत्त्वाचा असला पाहिजे. विद्यार्थी हा मुख्य घटक समजून शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे आणि अखेरपर्यंत ज्ञानाधिष्ठित राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून प्रा. किसनराव कुराडे यांनी सध्याचे शैक्षणिक धोरण आहे नेमके कोणत्या व कोणाच्या हिताचे आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे हित साधण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तरी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विनाअनुदान ही शिक्षण पद्धती बंद झाली पाहिजे. यूजीसीच्या माध्यमातून ठोस असे कार्य होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार नॅकचे समन्वयक प्रा.किशोर अदाटे यांनी मानले.