गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात दिनांक 15 ऑक्टोबरला भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालय वाडमय मंडळ व भाषा विभागाच्यावतीने लेखक "तुमच्या भेटीला" हा उपक्रम आयोजित केला आहे. साहित्य निर्मिती, त्याची प्रक्रिया, टप्पे या गोष्टी विद्यार्थ्यांसमोर उलगडण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार किरण गुरव हे विद्यार्थी, वाचकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले आहे.
कथाकार किरण गुरव यांनी लिहिलेल्या "बाळूच्या अवस्थांतराची डायरी" या कथासंग्रहाला मराठी भाषेचा 2021 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी, जुगाड, क्षुधाशांती भुवन आदी साहित्यांचे लेखन ग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या विविधतेवर आपल्या लेखणीने रेखाटले आहे.
त्यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीला जळगाव येथील भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा ना.धो.महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखन पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन ( अमेरिका ) व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ललित पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा ग. ल.ठोकळ पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशनचा सुभाष भेंडे पुरस्कार, शरद प्रकाशन यांचा बाबुराव बागल पुरस्कार, "जुगाड" या कादंबरीला बी.रघुनाथ पुरस्कार, पद्मश्री डॉ. विठ्ठराव विखे- पाटील पुरस्कार( प्रवरानगर ), भी.ग. रोहमारे पुरस्कार ( कोपरगाव ), ए. पा.रेंदाळकर पुरस्कार ( रेंदाळ) आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिवाय त्यांची "जुगाड" ही कादंबरी शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. दोनच्या व श्रीलिपी या पुस्तकातील "वडाप" या कथेचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.