जुन्या जॅकवेलनजीक ग्रामपंचायतीमार्फत जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करणार
या केंद्रात सौर ऊर्जेवरील यंत्रणा बसविण्यात येणार
दिवाळीनंतर गावात जवळपास पंचवीस ते तीस लाखाची विकास कामे हाती घेण्यात येणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षापासून तेरणी गावातील ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार आहे. पाणी प्रश्नांसह गावात दिवाळीनंतर जवळपास पंचवीस ते तीस लाखांची विकास कामे हाती घेतली जाणार आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील विविध समस्या मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील अशी ग्वाही सरपंच करवीर उथळे यांनी दिली.
गावातील लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जुन्या जॅकवेल नजीक जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी विज बिल बचतीसाठी या ठिकाणी सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या सौरउर्जेवर 25 एचपी मोटर चालण्याची क्षमता असणार आहे. तसेच 15 व्या वित्त आयोगातून गावातील गटारी व रस्त्यांची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत.
पाच लाख खर्चून विठ्ठल मंदिर नजीकच्या गटारीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच गावातील सर्व अंगणवाड्यांना बेंचची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जवळपास दोन लाखाचा निधी खर्च होणार आहे. तसेच बोलकी अंगणवाडी उपक्रमासाठी एक लाखाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. गावातील मराठी विद्या मंदिर व अंगणवाड्यांसाठी टीव्ही संच तसेच प्रोजेक्टर देण्यात येणार आहे. यासाठी जवळपास दोन लाखाचा निधी उपलब्ध केला आहे.तसेच ग्रामपंचायत समोरील रस्ता डांबरीकरणाचे कामही हाती घेतले जाणार आहे. मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरात फरशी बसविणे तसेच गटारींची कामे मार्गी लावली जाणार आहेत.असे सरपंच करवीर उथळे यांनी सांगितले.
तसेच ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने तेरणी- मनवाड रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. या रस्त्यामुळे तेरणीकराना गडहिंग्लजला जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. सध्या रस्त्याचे खडीकरण झाले असून डांबरीकरण काम लवकरात लवकर होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे देखील सरपंच करवीर उथळे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने गावच्या विकासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न राहील असे सरपंच श्री. उथळे यांनी सांगितले.